नायरा पेट्रोल पंपापुढील भव्य अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी? प्रशासनाच्या मौनावर नागरिकांचे प्रश्न

विशेष बातमी प्रतिनिधी | वसई-विरार

​वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामांविरोधात एकीकडे कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे प्रभाग समिती ‘फ’ (पेल्हार) अंतर्गत येणाऱ्या श्रीराम नगर भागात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. श्रीराम नगर येथील नायरा पेट्रोल पंपाच्या समोर लाखो स्क्वेअर फुटांवर सर्रासपणे अनधिकृत बांधकाम उभारले जात असून, या गंभीर प्रकारावर सहाय्यक आयुक्त दीपक सावंत आणि अतिक्रमण पथकाने बाळगलेले ‘मौन’ आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पेल्हार परिसरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी पत्र्याचे भव्य शेड आणि इतर अनधिकृत रचना उभी राहत आहे. हे अनधिकृत बांधकाम मनपाच्या अतिक्रमण पथकाची आणि जेसीबीची जणू वाट पाहून थकले आहे, परंतु पालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

‘त्या’ प्रभावापुढे प्रशासन हतबल?

​स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे अनधिकृत बांधकाम एका राजकीय अथवा सामाजिकदृष्ट्या वजनदार कुटुंबाशी संबंधित असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच या बांधकामावर हातोडा चालवणे मनपाच्या अधिकाऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे का? असा रोखठोक सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. ‘सबका साथ, अनधिकृत बांधकामांना अभय’ अशी परिस्थिती तर निर्माण झाली नाही ना? आणि या दबावापोटीच सहाय्यक आयुक्त दीपक सावंत कारवाई करण्यास कचरत आहेत का? अशा चर्चांना आता पेल्हार परिसरात उधाण आले आहे.

नागरिकांचे सवाल:

  • ​लाखो स्क्वेअर फुटांचे बांधकाम चालू असताना पालिका प्रशासनाला ते दिसले नाही का?
  • ​या बांधकामाला पालिकेची परवानगी आहे का? नसेल तर त्वरित कारवाई का केली जात नाही?
  • ​एका प्रभागातील अधिकाऱ्यांची ही ‘सुप्त संमती’ प्रशासकीय दुर्लक्षाचे लक्षण आहे की ‘मेहेरबानी’?
तथास्तुचा वरदहस्त की निष्पक्ष कारवाई?

​वसई-विरार मनपा आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कायद्याचा बडगा सर्वसामान्यांप्रमाणेच वजनदारांवरही तितक्याच कठोरपणे उगारला जाणार, की या अनधिकृत बांधकामाला ‘तथास्तु’चा वरदहस्त मिळून ते कायद्याला आणि प्रशासनाला असाच तोंडघशी पाडत राहणार? हे येणारा काळच ठरवेल. परंतु सध्या तरी पेल्हारमधील हे चित्र मनपाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *