
वसई : प्रशासकीय अनागोंदी आणि दिरंगाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना कसा बसतो, याचा धक्कादायक प्रत्यय सध्या वसई तहसीलदार कार्यालयात येत आहे. सन २०२४ मध्ये जन्म आणि मृत्यूच्या उशिराच्या नोंदणीसाठी दाखल करण्यात आलेल्या असंख्य प्रकरणांच्या मूळ फाईल्स कार्यालयातून गहाळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बेजबाबदार कारभारामुळे वकील आणि पक्षकार हतबल झाले असून, प्रशासनाच्या या कार्यपद्धतीविरोधात ‘शिव विधी व न्याय सेने’ने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काय आहे नेमके प्रकरण? जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ च्या तरतुदींनुसार विलंबित नोंदणीच्या प्रकरणांमध्ये सुनावणी घेण्याचे अधिकार संबंधित प्राधिकाऱ्यांकडे असतात. सन २०२४ मध्ये वसई तहसीलदार कार्यालयात अशी अनेक प्रकरणे दाखल झाली होती. त्यावेळी ही प्रकरणे अधिकृत टपाल आवक-जावक (इनवर्ड) विभागामार्फत न घेता, संबंधित टेबलवरील कर्मचारी राजू आपटेकर यांच्याकडे थेट जमा करण्यास सांगण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, दोन वर्षे उलटूनही यापैकी बहुतांश प्रकरणांवर सुनावणीच झाली नाही.
मूळ कागदपत्रांची पंचाईत आणि दुहेरी मनस्ताप कायदेशीर प्रक्रियेतील बदलानुसार, दोन वर्षांपेक्षा अधिक विलंब झालेल्या जन्म-मृत्यू नोंदणीच्या प्रकरणांवर कार्यवाही करण्याचे अधिकार आता पुन्हा वसई दिवाणी न्यायालयाकडे वर्ग झाले आहेत. त्यामुळे पक्षकारांना ही प्रकरणे नव्याने न्यायालयात दाखल करावी लागत आहेत. मात्र, न्यायालयात अर्ज दाखल करताना महापालिकेचे किंवा ग्रामपंचायतीचे ‘अनुउपलब्धता प्रमाणपत्र’ (नॉन-अव्हेलेबिलिटी सर्टिफिकेट), वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि इतर मूळ पुरावे जोडणे बंधनकारक असते. ही सर्व मूळ कागदपत्रे यापूर्वीच तहसील कार्यालयात जमा केली असल्याने आणि आता त्या फाईल्सच सापडत नसल्याने पक्षकारांसमोर मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. मूळ कागदपत्रे पुन्हा मिळवण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
कामात भेदभावाचा गंभीर आरोप या प्रकरणात प्रशासकीय कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना शिव विधी व न्याय सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य ॲड. गिरीश दिवाणजी आणि पालघर जिल्हाध्यक्ष ॲड. दिनेश आदमणे यांनी थेट भेदभावाचा आरोप केला आहे. सन २०२४ मध्ये वकिलांमार्फत कायदेशीर प्रक्रियेने दाखल झालेल्या प्रकरणांना जाणीवपूर्वक बगल देण्यात आली, तर काही खासगी व्यक्तींमार्फत आलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात आली, असे त्यांचे म्हणणे आहे. शासकीय दप्तरातून मूळ कागदपत्रे गहाळ होणे हा महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हा असून, यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, याची सखोल चौकशी होण्याची मागणी त्यांनी केली आहे.
“शासकीय कार्यालयातील निष्काळजीपणामुळे मूळ कागदपत्रे गहाळ होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याचा मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असून, वकिलांनाही पक्षकारांसमोर विनाकारण स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. तहसीलदारांनी तातडीने या गहाळ फाईल्सचा शोध घ्यावा आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी; अन्यथा शिव विधी व न्याय सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल.” – ॲड. गिरीश दिवाणजी (राज्य कार्यकारिणी सदस्य) व ॲड. दिनेश आदमणे (पालघर जिल्हाध्यक्ष), शिव विधी व न्याय सेना
- अधिकृत टपाल विभागाऐवजी थेट कर्मचाऱ्याकडे प्रकरणे जमा करून घेण्याची पद्धत कोणाच्या आदेशाने सुरू होती?
- दोन वर्षे प्रकरणे प्रलंबित राहिल्यानंतरही ती निकाली का काढली गेली नाहीत?
- शासकीय दप्तरातून गहाळ झालेल्या मूळ कागदपत्रांची जबाबदारी कोणावर निश्चित होणार?



