युवाशक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा, वसई:

​गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरात ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा बिकट परिस्थितीतही प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्थानिक नगरसेविका ॲड. दीप्ती चेतन भोईर स्वतः रस्त्यावर उतरल्या आहेत. लोकनेते हितेन्द्रजी ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस आणि स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील विविध समस्यांवर त्यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने युद्धपातळीवर कार्यवाही केली आहे.

​झाडे हटवली; वाहतूक केली सुरळीत

​प्रभागातील नानभाट-शिडी येथील मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. स्थानिक कार्यकर्ते कपिल निजाई यांनी ही बाब निदर्शनास आणून देताच नगरसेविका ॲड. दीप्ती भोईर यांनी तात्काळ मनपा कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यांच्या उपस्थितीत रस्त्यावरील झाड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. तसेच नाळा, देवीची वाडी येथील मुख्य रस्त्यालगत एका धोकादायक झाडामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली होती. कार्यकर्ते सौरभ चौधरी यांच्या माहितीनंतर, नगरसेविकांनी मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला पाचारण करून स्वतःच्या देखरेखीखाली ते धोकादायक झाड हटवून घेतले.

​पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने तोडगा

​मांगेला आळी आणि नाळा येथील साईबाबा मंदिर परिसरात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. नगरसेविकांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने तत्परतेने पाणी निचऱ्याचा मार्ग मोकळा करून दिला. तसेच बोलिंज येथील बंदरपाडा कब्रस्थानसमोरील तुंबलेल्या गटाराची समस्या माजी सरपंच मन्सूर शेख व फरजाना शेख यांनी मांडताच, मनपा अभियंत्यांना घटनास्थळी बोलावून सदर गटार तातडीने साफ करून घेण्यात आले.

​खचलेला रस्ता व गटारांची दुरुस्ती

​निर्मळ-नवाळे येथील तलावाजवळील मुख्य रस्ता मुसळधार पावसामुळे खचला होता, ज्यामुळे गंभीर अपघाताचा धोका होता. स्थानिक कार्यकर्ते निखिल वर्तक व प्रसाद वर्तक यांच्या सूचनेनंतर नगरसेविकांनी मनपा प्रशासनाशी समन्वय साधून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून घेतली. याशिवाय, नाळा जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील स्मशान रोडवरील गटाराचा स्लॅब तुटल्याची माहिती कार्यकर्ते नितेश चौधरी यांनी दिली असता, प्रशासनामार्फत तिथेही त्वरित दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.

नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

सलग पडणाऱ्या मुसळधार पावसातही कार्यालयात न बसता, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कायद्याच्या चौकटीत राहून आणि प्रशासकीय नियमांचे पालन करत नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या ॲड. दीप्ती चेतन भोईर यांच्या या तत्परतेचे आणि जनसेवेचे संपूर्ण प्रभागात कौतुक होत असून नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

​या सर्व मोहिमेदरम्यान नगरसेविकांसोबत नितेश चौधरी, जयेश चौधरी, समीर चौधरी, रितेश राऊत, हृषीकेश चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रेय चौधरी, भालचंद्र चौधरी तसेच ॲड. चेतन भोईर व इतर स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *