
वसई: वसई तालुक्यातील कामगारांचे प्रश्न आणि पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘युवाशक्ती कामगार संघटना’ व ‘युवाशक्ती मीडिया प्रेस अँड फिल्म वर्कर्स युनियन’ सज्ज झाली आहे. संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष रुबीना मुल्ला यांच्या उपस्थितीत वसई तालुका कार्यकारणीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यामध्ये हरेश रमेश कोटकर यांची वसई तालुका अध्यक्षपदी, रुपेश रमेश मोहिते यांची कार्याध्यक्षपदी, तर किशोर जनार्दन मोहिते यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्रकारितेची ‘दिशा आणि दशा’ यावर मंथन
यावेळी ‘युवाशक्ती मीडिया प्रेस अँड फिल्म वर्कर्स युनियन’च्या तालुका अध्यक्षपदी कमर बेग यांची निवड करण्यात आली. आपल्या आक्रमक भाषणात बेग यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर उपस्थितांचे लक्ष वेधले. “शासनाकडून पत्रकारांकडे होणारे दुर्लक्ष आणि पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच पत्रकारांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे का, यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रशासकीय दिरंगाईवर टीका
नवनियुक्त तालुका अध्यक्ष हरेश रमेश कोटकर यांनी उपस्थितांचे आभार मानताना स्थानिक प्रशासनाच्या ‘ढिम्म’ कारभारावर ताशेरे ओढले. नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रशासन उदासीन असल्याचे सांगत त्यांनी लवकरच विशेष कार्यशाळा आयोजित करण्याचे आश्वासन दिले. कार्याध्यक्ष रुपेश रमेश मोहिते यांनी सरकारी योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तरुणांसाठी रोजगार शिबिरे घेण्यावर भर दिला.
महिला कामगारांचे प्रश्न आणि संघटन बांधणी
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संघटन बांधणी आणि सभासद नोंदणी करणार असल्याची ग्वाही सरचिटणीस किशोर जनार्दन मोहिते यांनी दिली. कामगार वर्गातील महिलांमध्ये वाढत असलेला असंतोष दूर करण्यासाठी संघटना विशेष पावले उचलणार आहे. तसेच श्रमिक वर्गासाठी आरोग्य शिबिरे आणि कायदेविषयक मार्गदर्शन उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
जावेद नासिर खान यांच्यावर नवी जबाबदारी
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी, संस्थापक अध्यक्ष रुबीना मुल्ला यांच्या हस्ते जावेद नासिर खान यांची ‘कामगार नेता’ या हिंदी पाक्षिकाच्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती करण्यात आली. कायद्याच्या चौकटीत राहून सकारात्मक आणि सामाजिक भान जपणारी पत्रकारिता करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

संस्थापक अध्यक्ष रुबीना मुल्ला हे हरेश कोटकर यांस वसई तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती पत्र घेताना छायाचित्र मध्ये दिसत आहे

संस्थापक अध्यक्ष रुबीना मुल्ला हे रुपेश मोहिते यांस वसई तालुका कार्यध्यक्ष पदी नियुक्ती पत्र घेताना छायाचित्र मध्ये दिसत आहे

संस्थापक अध्यक्ष रुबीना मुल्ला हे किशोर मोहिते यांस वसई तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती पत्र घेताना छायाचित्र मध्ये दिसत आहे

युवाशक्ती मीडिया प्रेस, अँड फिल्म वर्कर्स युनियन संस्थापक अध्यक्ष रुबीना मुल्ला हे कमर बेग यांस वसई तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती पत्र घेताना छायाचित्र मध्ये दिसत आहे.

जावेद नासिर खान यांची हिंदी पाक्षिक कामगार नेता कार्यकारी संपादक पदी नियुक्ती पत्र देताना युवाशक्ती मीडिया, प्रेस अँड फिल्म वर्कर्स युनियन च्या संस्थापक अध्यक्ष रुबीना मुल्ला छायाचित्रात दिसत आहे
