विरार: (विशेष प्रतिनिधी)
जिथे ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हाच धर्म मानला जातो, तिथेच खऱ्या अर्थाने समतेची पहाट होते. याच विचारांचा जागर करत, माणूसकी फाऊंडेशन (रजि.) यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘नारीशक्ती सन्मान’ पुरस्कार सोहळा नुकताच विरारमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. केवळ सत्कार नव्हे, तर समाजातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढींविरुद्ध प्रबोधनाचे शस्त्र उगारत या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.
महामातांना अभिवादन आणि ‘माणूसकी’चे स्वर
सार्वजनिक वाचनालय इमारतीच्या सभागृहात आयोजित या सोहळ्याची सुरुवात अत्यंत प्रेरणादायी वातावरणात झाली. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर या महामातांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हे मानुसकीचे ब्रीदवाक्य असलेले गीत सादर केले, ज्यामुळे संपूर्ण सभागृह सकारात्मक ऊर्जेने भरून गेले.
प्रबोधनाचा जागर आणि स्त्री-इतिहासाचा वारसा
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महिला उपसचिव तेहसीन चिंचोलकर यांनी फाऊंडेशनच्या वर्षभरातील सामाजिक कार्याचा आढावा घेतला. तर, संस्थेचे सचिव राजेश जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांच्या सक्षमीकरणावर भाष्य केले.

“इतिहास साक्षी आहे की, जेव्हा-जब्या स्त्रीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, तेव्हा समाज बदलला आहे. परंतु आजच्या आधुनिक युगातही महिला अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि चमत्कारांच्या जाळ्यात अडकत आहेत. हा विळखा तोडणे हीच खरी स्त्री-मुक्ती ठरेल,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या हक्कांची जाणीव ठेवणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कर्तृत्वाचा ‘नारीशक्ती’ गौरव
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना मान्यवरांच्या हस्ते ‘नारीशक्ती सन्मान पुरस्कार’, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा रजनीताई गडा यांच्यासह प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या अमृता सावंत, सुषमा अहिरे, रामेश्वरी शिंदे आणि डॉ. शशिकला शर्मा (प्राचार्य) उपस्थित होत्या. या महिलांच्या उपस्थितीने व्यासपीठाला एक वेगळीच प्रतिष्ठा लाभली होती.
मान्यवरांची उपस्थिती अन् यशस्वी नियोजन
या सोहळ्याला ओबीसी नेते संतोष आंबेकर, मैत्री संस्थेचे अध्यक्ष सूरज भोईर, सुभाष जाधव, राजेश मोरे, पत्रकार ओ.पी. सिंग आणि जितेश वोरा यांसारख्या प्रतिष्ठित मंडळींनी उपस्थित राहून कौतुक केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन महिला सचिव ज्योतीताई तांबे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ॲड. किरण म्हात्रे यांनी मानले. राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष घनश्याम आंबोकर, उपाध्यक्ष विजय काकडे, सचिव राजेश जाधव, सहसचिव सुभाष आंबोकर आणि खजिनदार विजय गोडबोले यांनी विशेष परिश्रम घेतले. ‘माणूसकी’चा हा उपक्रम विरारमधील पुरोगामी चळवळीला बळ देणारा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed