




वसई (पालघर):
वसई पूर्व भागातील शांतीनगर-धानिव, नवजीवन वसाहत आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार परिसर सध्या एका गंभीर समस्येच्या खाईत लोटला गेला आहे. दिवसा शांत भासणारा हा परिसर रात्री होताच विषारी धुराच्या दाट चादरीत लपेटला जात असून, येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भंगार व्यावसायिकांच्या मनमानी कारभारापुढे प्रशासन हतबल ठरल्याचे चित्र असून, याप्रकरणी पेल्हार पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.शांतीनगर-धानिव येथील बुडिया पाडा परिसरातील भंगार चाळीत जुनी वाहने आणली जातात. येथे ही वाहने तोडून त्यांचे स्पेअर पार्टस् विकले जातात. मात्र, या प्रक्रियेत उरलेले निकामी साहित्य—विशेषतः टायर, रबर, पीव्हीसी वायरिंग आणि प्लास्टिक—उघड्यावर बेछूट जाळले जाते. एवढेच नव्हे तर, गॅस सिलिंडरचे टाकाऊ भागही धोकादायकरीत्या कापले जातात. या प्रक्रियेतून निघणारा काळाकुट्ट आणि विषारी धूर सुमारे एक किलोमीटर परिसरात पसरत असून, नागरिकांच्या घरातील दारे-खिडक्या बंद असल्या तरी हा धूर घरात शिरत आहे.हा प्रकार केवळ अपवादात्मक नसून रोज रात्रीचा ठरला आहे. आज (दिनांक २७) रात्री १ वाजेनंतर याच भंगार गल्लीत पुन्हा मोठ्या प्रमाणावर टायर आणि रबर जाळण्यात आले. या जीवघेण्या धुरामुळे लहान मुलांना रात्रभर खोकला लागणे, वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ होणे आणि गरोदर महिलांना गंभीर शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते बापू अहिरे यांनी या प्रकाराचे व्हिडिओ पुरावे देखील गोळा केले असून, यामध्ये धुराचेलोट स्पष्टपणे दिसत आहेत.पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार उघडपणे सुरू असतानाही पेल्हार पोलीस ठाण्याकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. “पोलिसांना या अवैध भंगार व्यवसायातून हप्ता मिळतो का?” असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे. प्रशासनाच्या या डोळेझाक भूमिकेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे.
ठाम मागण्या:
१. शांतीनगर-धानिव, बुडिया पाडा येथील संबंधित भंगार चाळीवर तात्काळ छापा टाकावा.
२. बेकायदेशीरपणे विषारी धूर पसरवणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये कठोर गुन्हे दाखल करावेत.
३. नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ही अवैध भंगार चाळ कायमस्वरूपी सील करण्यात यावी.
शुद्ध हवेत श्वास घेणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून, प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा मानव अधिकार मिशनचे वसई तालुका अध्यक्ष किशोर जनार्दन मोहिते यांनी दिला आहे.
