
वसई | प्रतिनिधी
सातिवली परिसरातील राजदीप इंडस्ट्रियल आणि इतर भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर अद्याप कारवाई न झाल्यामुळे आणि दलित समाजावरील अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाकडून ‘भीक मागो आंदोलन’ करण्यात येणार आहे. हे आंदोलन २० जून रोजी सकाळी ११ वाजता वसई-विरार महानगरपालिका मुख्यालयासमोर पार पडणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हा सरचिटणीस व सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रोहित ससाणे हे करणार असून जिल्हाध्यक्ष मनोज म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत.
सातिवली येथील मौर्यानाका परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत पत्र्याचे शेड, वाढीव बांधकामे आणि पोटमाळा टाकण्याचे प्रकार सुरु आहेत. स्थानिक नागरिकांनी याची वारंवार तक्रार सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांच्याकडे केली असली, तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, ७ एप्रिल रोजी याच अधिकाऱ्यांनी डाईस बिल्डिंगच्या मागे गरीब बौद्ध महिलांच्या टपऱ्या निर्दयतेने हटवल्या, असा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे.
आंदोलनाचे प्रमुख नेते रोहित ससाणे यांनी म्हटले की, “दलितांच्या टपऱ्या तोडताना प्रशासन अत्यंत तत्परतेने कारवाई करते. मात्र श्रीमंत बिल्डर आणि उद्योगपतींच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना त्यांना मोकळे रान दिले जाते. हे आम्ही सहन करणार नाही.”
यावेळी त्यांनी सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे आणि उपायुक्त दीपक सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
“दलितांवर कठोर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी श्रीमंत गुन्हेगारांवर कारवाई केली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागेल आणि हे आंदोलन त्याची सुरुवात असेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
