

वसई, दि. ८ ऑगस्ट २०२५ – वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती “जी” अंतर्गत वालीव कार्यक्षेत्रात मध्यरात्री अचानक छापेमारी करत सुमारे ३५०० किलो (३.५ टन) प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच संबंधित व्यक्तीकडून ५००० रुपये दंडाची वसुली करण्यात आली.
ही कारवाई मा. आयुक्त श्री. मनोजकुमार सूर्यवंशी व मा. अति. आयुक्त श्री. संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. उपआयुक्त श्रीमती अर्चना दिवे व सहा. आयुक्त श्रीमती नीता कोरे यांच्या आदेशानुसार पार पडली.
कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विकास पाटील यांनी केले. त्यांच्या समवेत कनिष्ठ आरोग्य निरीक्षक विनोद पाटील, गणेश घरत, केदार चव्हाण, अभिषेक कदम व मार्शल जितेश ठाकुर हे अधिकारी देखील उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या वतीने प्रतिबंधित प्लास्टिकच्या साठवणुकीवर व विक्रीवर सातत्याने कठोर पावले उचलली जात असून, अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
