



वसई : वसईतील सागर शेत पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये पाणी आढळून आल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकाराची माहिती युवाशक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबीना मुल्ला यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पुरावे व जनतेच्या प्रतिक्रिया गोळा करून प्रशासनाच्या निदर्शनास आणली.
त्यानंतर वसई तहसील पुरवठा अधिकारी श्री. सोनार यांनी तत्काळ पंपावर धाड टाकून कारवाई केली.
ग्राहकांच्या तक्रारीनुसार, पाण्यामुळे अनेक वाहनांचे इंजिन बंद पडले असून वाहनांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पत्रकारितेच्या दायित्वातून, मुल्ला यांनी संबंधित सर्व पुरावे प्रशासनाकडे लेखी मेलद्वारे पत्रव्यवहारातून सादर केले.
प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित पेट्रोल पंपावरील साठ्याची तपासणी करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना फसवणूक व नुकसान होऊ नये म्हणून संबंधित पंपावर आवश्यक ती दंडात्मक व दुरुस्तीची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, ज्यांच्या वाहनांमध्ये दूषित पेट्रोलमुळे पाणी गेले आहे, त्यांच्या वाहनांचे इंजिन दुरुस्त करणे व नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी पेट्रोल पंप मालकावर टाकण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या कारवाईमुळे ग्राहकांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, या घटनेने इंधन पुरवठा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जबाबदारी यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
