विरार, दि. 25 ऑगस्ट 2025
गणेशोत्सवासारखा आनंदोत्सव असताना वसई-विरार शहरातील नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरून गणपती बाप्पांचे स्वागत करावे लागत आहे, ही वसई-विरार महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची अपयशाची आणि लाजिरवाणी बाब आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे मीडिया प्रमुख कमर बेग यांनी केली आहे.

शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरून अभियंते स्वतःची पाठ थोपटत असले तरी गल्ल्या, आंतररस्ते आणि प्रभागांमधील रस्त्यांची अवस्था बिकटच आहे. खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असून, नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. “करदात्यांच्या पैशावर पोसलेले अभियंते आणि ठेकेदार हे फक्त भ्रष्टाचाराच्या गाठी बांधण्यात गुंतलेले आहेत,” असा थेट आरोप कमर बेग यांनी केला.

काँक्रीट रस्त्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदरमध्ये काँक्रीट रस्त्यांवर भर देण्यात येत असताना वसई-विरारमध्ये आजही डांबरी रस्त्यांचा वापर करून ठेकेदारांना फायदा पोहोचवला जातो. “हे नागरिकांशी केलेले अन्यायकारक वर्तन आहे. वसई-विरारमध्ये काँक्रीट रस्ते तातडीने करण्यात यावेत, अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने दिला आहे.

अपघात व जबाबदारी
खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत जखमी अथवा मृत्यू झाल्यास संबंधित अभियंते आणि ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी कमर बेग यांनी स्पष्ट शब्दांत केली.

मोठ्या आंदोलनाची चेतावणी
गणेशोत्सव काळातही नागरिकांच्या सुरक्षेची पर्वा न करणारे प्रशासन हे संवेदनहीन असल्याचे सिद्ध झाले आहे. “जर महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) नागरिकांना सोबत घेऊन महापालिकेविरुद्ध मोठे आंदोलन उभारेल,” असा इशारा बेग यांनी दिला आहे.

नागरिकांचा सवाल उठवत थेट प्रहार
“मिरा-भाईंदरमध्ये काँक्रीट रस्ते होऊ शकतात, तर वसई-विरारमध्ये का नाही? अधिकारी आंदोलनाच्या धमकीची वाट पाहत बसले आहेत का? की ठेकेदारांच्या फायद्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे?” – असा थेट सवाल कमर बेग यांनी उपस्थित केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *