वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क अंतर्गत चंदनसार परिसरातील कातकरीपाडा येथे विद्युत खांबांवरील एलईडी दिवे गेल्या काही दिवसांपासून बंद पडले आहेत. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नईम इद्रीशी यांनी संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवली.

मात्र, ठेकेदाराकडे एलईडी दिवे उपलब्ध नसल्याने विभागातील कर्मचाऱ्यांनी जुन्या दिवे खांबांवरून उतरवून घेतले, परंतु नवे दिवे बसवले गेले नाहीत. त्यामुळे परिसरात रात्रीच्या वेळी अंधार पसरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, अशा अंधाऱ्या ठिकाणी असामाजिक घटकांना संधी मिळू शकते.

या संदर्भात नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी दिवाबत्ती विभागाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे मनुष्यबळ कमी असल्याचा दावा विभागाकडून केला जातो, तर दुसरीकडे एकाच कामावर वारंवार खर्च होतोय, अशी टीका नागरिकांकडून करण्यात आली आहे.

या कामकाजाबाबत ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा निष्काळजीपणाला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *