Oplus_131072

वसई (प्रतिनिधी ): डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर जितका सोयीचा ठरत आहे, तितकेच त्याचे धोकेही आता नागरिकांसमोर येऊ लागले आहेत. इन्स्टाग्रामवर दिसणाऱ्या एका ‘फ्री डाऊनलोड’ आणि आकर्षक मनोरंजनाच्या लालच दाखवणाऱ्या जाहिरातीच्या आहारी गेल्यामुळे वसईतील एका व्यक्तीला सायबर फसवणुकीचा मोठा फटका बसला आहे. कोणतीही परवानगी किंवा ओटीपी न देताच बँक खात्यातून परस्पर ७, हजार रुपयांची रक्कम लांबवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

नेमकी काय आहे घटना?

वसई पश्चिम येथील रहिवासी असलेल्या सोनल (सोनू मंचेकर यांना इन्स्टाग्राम रील्स पाहताना एक संशयास्पद जाहिरात दिसली.) या जाहिरातीत ‘फ्री डाऊनलोड’ (Free Download) आणि अमर्याद मनोरंजनाचे आमिष दाखवण्यात आले होते. या भुरळ पाडणाऱ्या जाहिरातीच्या मोहात पडून त्यांनी नकळत त्या लिंकवर क्लिक केले.

लिंकवर क्लिक करताच काही मिनिटांतच त्यांच्या गुगल पे (Google Pay) आणि बँक खात्यातून कोणताही ओटीपी किंवा यूपीआय पिन (UPI PIN) शेअर न करताच तब्बल ७,००० रुपयांची रक्कम परस्पर वजा झाली. एका छोट्याशा क्लिकमुळे झालेली ही फसवणूक पाहून पीडितेच्या पायाखालची जमीनच सरकली.

तातडीने बँक आणि सायबर सेलमध्ये धाव

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मंचेकर यांनी तातडीने बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) नालसोपारा पश्चिम शाखेत धाव घेतली. बँकेत अर्ज सादर करून हा अनधिकृत व्यवहार (Unauthorized UPI Transaction) त्वरित रोखण्याची आणि खात्यावर ‘डिस्प्यूट’ (Dispute) नोंदवून रक्कम परत मिळवून देण्याची विनंती त्यांनी केली. याशिवाय, त्यांनी राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर (www.cybercrime.gov.in) अधिकृत तक्रार दाखल केली असून (तक्रार क्रमांक: ३१९०८२६०१७०१०१) पोलीस आणि बँक याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

‘ विशेष सल्ला: सायबर चोरांपासून असे राहा सुरक्षित!

सोशल मीडियावर रोज नवनवीन क्लृप्त्या वापरून नागरिकांना लुटले जात आहे. अशा सायबर फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:

  • अनोळखी लिंक टाळा: सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही ‘फ्री’ ऑफर्स, मोफत डाऊनलोड किंवा बक्षीसांच्या संशयास्पद लिंकवर चुकूनही क्लिक करू नका.
  • गोपनीय माहिती शेअर करू नका: तुमचा युपीआय पिन (UPI PIN), ओटीपी (OTP), पासवर्ड किंवा एटीएम कार्डचे तपशील कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला किंवा बनावट फॉर्मवर देऊ नका.
  • तातडीने मदत घ्या: तुमच्यासोबत अशा प्रकारचा फ्रॉड झाल्यास अजिबात न ঘबरता तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राईमच्या १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा त्यांच्या वेबसाईटवर तक्रार नोंदवा. तसेच त्वरित आपल्या बँकेशी संपर्क साधून खाते ब्लॉक करून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *