
विरार (प्रतिनिधी):
वसई–विरार शहर महानगर पालिकेच्या अखत्यारीतील श्री जीवदानी देवी रुग्णालय, चंदनसार, विरार (पूर्व) येथे रुग्ण पळून जाण्याच्या घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अलिकडच्या काळात अशा तीन घटना घडल्याचे समोर आले असून, १० ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा एक रुग्ण रुग्णालयातून पळून गेला, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.
सदर रुग्णाचा त्याच दिवशी मृत्यू झाल्याची स्थानिक चर्चा असून, मृत्यू झाल्यानंतर त्याला पुन्हा त्याच रुग्णालयात आणण्यात आले. परंतु मृतदेहाचे पोस्टमार्टम न करता थेट मृत घोषित करण्यात आल्याने संशयाचे ढग निर्माण झाले आहेत.
प्रशासनाचे मौन प्रश्न निर्माण करणारे
घटनास्थळी सुरक्षा रक्षक व वैद्यकीय अधिकारी उपस्थित असताना रुग्ण पळून जाणे ही गंभीर बाब आहे. यावरून रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
रुग्ण पळून गेल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली नाही, हे विशेष लक्षवेधी ठरत आहे.
या प्रकरणाबाबत वैद्यकीय अधिकारी आणि महानगर पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी “असे काही घडलेले नाही” असे सांगत हात झटकले, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पडद्यामागे कोणाचा हात?
सदर प्रकरण मनपा आयुक्तांच्या निदर्शनास येऊ न देता काही अधिकारी तथ्य लपवत आहेत का? असा गंभीर प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.
संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
जनतेची मागणी
या संदर्भात १० ऑक्टोबर २०२५ च्या CCTV फुटेजची तपासणी करून सत्य जनतेसमोर आणावे, तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी मनपा आयुक्त व जिल्हा प्रशासनाने तातडीने करावी, अशी जनतेची मागणी आहे.
तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी–कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे आवाहन नागरिकांनी केले आहे.
