

वसई (दि. २५ ऑक्टोबर २०२५):
मुंबई पोलिसांनी अलीकडेच केलेल्या धाडीत उघडकीस आलेली कथित ड्रग्ज फॅक्टरी आता नव्या वादात सापडली आहे. ही फॅक्टरी वसई तालुक्यातील मौजे पेल्हार परिसरातील आदिवासी बांधवांच्या जमिनीवर उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक व आदिवासी प्रतिनिधींनी केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित जमीन ही नवीन शर्तीने आदिवासी बांधवांना वाटप झालेली वन जमीन असल्याचे सांगितले जाते. तथापि, या जमिनीवर गाळे उभारण्यात आले आणि त्यानंतर वीज जोडणी व मालमत्ता कर नोंदीही करण्यात आल्या, असा दावा स्थानिकांनी केला आहे. या संदर्भात दि. २६ मार्च २०२४ रोजी वसई-विरार महापालिका आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र त्या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचे आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी सदर ठिकाणी ड्रग्ज निर्मिती संदर्भात छापा मारून तपास सुरू केला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी संशयित पदार्थांचे नमुने जप्त करण्यात आले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
स्थानिक पातळीवर नागरिकांकडून महसूल, वन विभाग आणि महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. संबंधित विभागांकडून मात्र “प्रकरण तपासाधीन असून कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही केली जाईल” अशी प्रतिक्रिया मिळाली आहे.
या घटनेमुळे आदिवासी बांधवांच्या हक्काच्या जमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणांचा आणि प्रशासनाच्या प्रतिसादाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर बांधकामे हटविण्याची व जमिनीचा ताबा मूळ हक्कदारांकडे परत देण्याची मागणी होत आहे.
