एकल-अविवाहित विकास मंचतर्फे प्रमोद पाटील यांचे मुख्यमंत्रींकडे सादर पत्र

जळगाव :
सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहत, कोणत्याही कौटुंबिक आधाराशिवाय जीवन जगणाऱ्या ‘एकल-अविवाहित’ व्यक्तींना शासनाने दरमहा मानधन देण्याची मागणी एकल-अविवाहित विकास मंच तर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी मंचाचे संयोजक प्रमोद पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सामाजिक न्याय विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे.

प्रमोद पाटील यांच्या म्हणण्यानुसार, सध्या शासनाकडून अंध, अपंग, निराधार, वृद्ध नागरिक तसेच विविध सामाजिक गटांसाठी मानधन व कल्याणकारी योजना राबवल्या जातात. मात्र, स्वतःच्या इच्छेने किंवा सामाजिक परिस्थितीमुळे एकटे जीवन जगणाऱ्या ‘एकल’ व्यक्तींसाठी कोणतीही ठोस योजना उपलब्ध नाही.

पाटील म्हणाले, “एकल व्यक्ती समाजात स्वतःबरोबर इतरांसाठीही जबाबदारीची जाणीव ठेवून जीवन जगतात. त्यांचे आरोग्य, शिक्षण, निवास, रोजगार आणि सुरक्षितता हे प्रश्न महत्त्वाचे असून, शासनाने त्यांच्यासाठी विशेष योजना आखणे गरजेचे आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, एकल जीवन जगणारे नागरिक लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीनेही अप्रत्यक्षपणे शासनाच्या धोरणांना हातभार लावत आहेत. त्यामुळे या नागरिकांना मासिक मानधन, वैद्यकीय सवलती, निवास योजना व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ द्यावा.

‘आपुलकी सेवा केंद्र’ची मागणी :
अशा व्यक्तींसाठी ठिकठिकाणी ‘आपुलकी सेवा केंद्र’ स्थापन करून त्यांना मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर मार्गदर्शन मिळावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. या माध्यमातून एकल-अविवाहित नागरिकांना सन्मानपूर्वक आणि आत्मनिर्भर जीवन जगण्याची संधी मिळेल, असे पाटील यांनी सांगितले.

सामाजिक सहभागाची गरज :
मंचाच्या आवाहनानुसार समाजातील विविध सामाजिक संस्था, अभ्यासक, कॉर्पोरेट समूह व देणगीदारांनी या उपक्रमासाठी हातभार लावावा, तसेच अशा व्यक्तींना सहाय्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी आणि या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी प्रमोद पाटील (मो. ९३२६३५९२२९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *