
वसई पूर्व येथील हनुमत विद्यामंदिर, सातिवली कुवारपाडा शाळेत शिकणारी १३ वर्षीय काजल गौड या विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या प्रकरणाने स्थानिक स्तरावर खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थिनीला शाळेत दहा मिनिट उशीर झाल्यामुळे शिक्षकांनी शिक्षा दिल्याचा आरोप काही पालक व स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. शिक्षेमुळे तिची तब्येत बिघडल्याची चर्चा सुरू असून, तिला प्रथम आस्था हॉस्पिटल फादरवाडी, नंतर विजयालक्ष्मी हॉस्पिटल, आणि प्रकृती गंभीर झाल्याने JJ हॉस्पिटल, मुंबई येथे हलविण्यात आले.
काल सायंकाळी तिचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र, या संपूर्ण घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप प्रशासनाकडून झालेली नाही.
या प्रकरणावर रोहित ससाने यांनी आवाज उठवित, शाळा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून लोकआंदोलन उभारण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक स्तरावर आता प्रश्न उपस्थित होत आहे की –
गट शिक्षण अधिकारी या प्रकरणाची स्वयंसंज्ञान घेतील का?
विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या कारणांवर वैद्यकीय तसेच प्रशासकीय स्तरावर तपास होणार का?
की प्रकरण झाकण्याचा प्रयत्न होणार?
पालक व समाजातील नागरिकांची मागणी आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष आणि काटेकोर चौकशी व्हावी व दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी.
मुलांच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही शिथिलता स्वीकारली जाणार नाही, असा कडक संदेश समाजातून देण्यात येत आहे.
