
प्रभाग ४ मध्ये जीवदानीच्या आशीर्वादाने प्रचाराचा दणदणीत शुभारंभ

वसई :
वसई–विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रभाग क्रमांक ४ मध्ये जोरदार तयारी करत प्रचाराला अधिकृत सुरुवात केली आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार (अ) नीता सचिन राऊत, (ब) संध्या गिरीश दिवाणजी, (क) अजय सदानंद पिंपळे आणि (ड) सचिन वसंत राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रद्धास्थान असलेल्या जीवदानी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन करण्यात आला.
देवीच्या आशीर्वादानंतर प्रचार फेरीने जीवदानी पाडा, राक्षस पाडा, अण्णा पाडा आणि आंबेडकर नगर या भागांत प्रवेश केला. या प्रचारात शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवक सेना तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. ढोल–ताशे, घोषणा आणि नागरिकांशी थेट संवाद यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले.
या प्रचारात विशेष लक्ष वेधून घेतले ते शिवसेनेच्या उमेदवार संध्या गिरीश दिवाणजी यांनी. त्यांच्या पती ॲड. गिरीश दिवाणजी हे वकिली क्षेत्रात कार्यरत असून, आंबेडकरी समाजात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे नेते म्हणून ते जिल्ह्यात परिचित आहेत.
ॲड. गिरीश दिवाणजी यांच्या सामाजिक व चळवळीतील कार्याला संध्या दिवाणजी या नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळेच केवळ “उमेदवार” नव्हे, तर चळवळीतील अनुभवी कार्यकर्ती म्हणून त्यांची ओळख प्रभागात तयार झाली आहे. स्थानिक नागरिकांचे प्रश्न, विशेषतः महिला, गृहिणी, पाणी, स्वच्छता, आरोग्य व मुलांच्या समस्या त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ठाऊक आहेत.
गृहिणी महिला म्हणून घराघरातील झळ त्या स्वतः अनुभवत आल्या असल्याने, त्या प्रश्नांना केवळ कागदावर नव्हे तर जमिनीवर उतरून सोडवतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळेच संध्या दिवाणजी यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र प्रभाग ४ मध्ये दिसून येत आहे.
एकूणच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने स्वच्छ प्रतिमा, सामाजिक बांधिलकी आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवारांच्या बळावर निवडणूक रिंगणात भक्कम पाऊल टाकले असून, विकासासाठी योग्य व संवेदनशील नेतृत्व निवडण्याचे आवाहन मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या प्रचारातून करण्यात येत आहे.

