वसई : सामाजिक न्याय, समता आणि संविधान मूल्यांची मशाल हाती घेऊन काम करणाऱ्या भीम आर्मी – भारत एकता मिशनने वसई तालुका अध्यक्षपदी रुपेश रमेश मोहिते यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र दिलीप अवसस्मोल जिल्हा पालघर यांनी जाहीर केले असून, या निर्णयामुळे वसईतील आंबेडकरी चळवळीला नवे बळ मिळाले आहे.

रुपेश मोहिते हे सामाजिक प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवणारे, तरुणांमध्ये लोकप्रिय आणि स्वच्छ प्रतिमा असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गोरगरीब, वंचित, पीडित घटकांचे प्रश्न रस्त्यावर उतरून मांडणे, प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आणि संविधानिक मार्गाने न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला आहे. याच कार्याची दखल घेत त्यांची ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रात संघटनेचे संस्थापक खासदार अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह, राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे आणि महाराष्ट्र प्रभारी अनिल धेनवाल यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची शिस्त, नियम व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. “जय भीम, जय संविधान” या घोषवाक्याला कृतीत उतरवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

आंबेडकरी चळवळीत अग्रेसर असलेले रुपेश मोहिते हे पुरोगामी विचारांनी प्रेरित तरुण नेतृत्व मानले जातात. सामाजिक अन्याय, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते भीम आर्मीच्या व्यासपीठावरून अधिक प्रभावीपणे लढा उभारतील, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

या नियुक्तीमुळे वसईत सामाजिक चळवळीला नवी दिशा मिळेल आणि तरुणांना संघटित करून संविधानिक मार्गाने परिवर्तन घडविण्यात रुपेश मोहिते महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *