
मुंबई, दादर :
महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे ज्येष्ठ नेते आयु. मिलिंद रानडे यांची युवाशक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबीना मुल्ला यांनी दादर येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान वसई-विरार शहर महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचारासह घनकचरा मजुरांवर होत असलेल्या अन्यायाची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात त्यांच्यासमोर मांडण्यात आली.
घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात कार्यरत मजुरांकडून ठेकेदारांमार्फत अतिरिक्त काम करून घेतले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच किमान वेतन, सुरक्षासाधने, आरोग्य सुविधा, ओळखपत्रे आणि कायद्याने मिळणाऱ्या मूलभूत हक्कांपासून मजुरांना वंचित ठेवले जात असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. काही प्रकरणांमध्ये मनपाच्या संबंधित अधिकारी व आरोग्य निरीक्षकांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदारांचे मनोबल वाढल्याचा गंभीर मुद्दाही चर्चेत आला.
या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत ज्येष्ठ कामगार नेते मिलिंद रानडे यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
“घनकचरा व्यवस्थापनातील मजूर हा शहराचा कणा आहे. त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणे ही केवळ सामाजिकच नव्हे तर नैतिक जबाबदारी आहे. मजुरांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात कायदेशीर मार्गाने ठोस संघर्ष करण्यात येईल. या लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, युवाशक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबीना मुल्ला यांनी प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली की,
घनकचरा व्यवस्थापनातील सर्व मजुरांना कायद्याने निर्धारित हक्क तात्काळ मिळावेत, ठेकेदारांकडून होत असलेल्या मनमानीवर कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
मजुरांच्या हक्कांसाठी सुरू असलेली ही लढाई केवळ वसई-विरारपुरती मर्यादित न राहता राज्यभरातील घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील प्रश्नांना न्याय देणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
