प्रतिनिधी, वसई

​वसई-विरारमधील सर्व माध्यमे आणि सर्वभाषिक पत्रकारांना एकाच छताखाली आणण्याच्या उद्देशाने स्थापन होत असलेल्या ‘वसई विरार महापालिका पत्रकार संघा’ची निवडणूक येत्या १२ जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीची अधिकृत घोषणा नुकतीच एका विशेष बैठकीत करण्यात आली. १५ जणांच्या कार्यकारिणीसाठी १ ते ५ जून दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. वसईच्या पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकशाही मार्गाने आणि मतदान प्रक्रियेद्वारे निवडणूक होत असल्याने माध्यमवर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

​शुक्रवारी वसई पूर्वेकडील हॉटेल रिजेन्सीमध्ये पत्रकार संघाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीला वसई-विरारमधील दैनिके, न्यूज चॅनेल्स, साप्ताहिके, डिजिटल मीडिया आणि यूट्यूब चॅनेल्सचे १५२ हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये महिला पत्रकारांची उपस्थिती लक्षणीय होती. या पत्रकार संघाच्या सदस्यत्वासाठी आतापर्यंत २०० हून अधिक जणांनी अर्ज दाखल केले असून, त्याला पत्रकारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

​निवडणूक कार्यक्रम जाहीर

​या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार डॉ. मयूर परिख आणि ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काश्यप यांची ‘निवडणूक निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करत मतदान प्रक्रियेची माहिती दिली.

  • उमेदवारी अर्ज भरणे: १ ते ५ जून
  • अर्ज माघारी घेण्याची मुदत: ६ जून
  • अर्जांची छाननी व अंतिम यादी: ७ जून
  • मतदान (मतपत्रिकेद्वारे): १२ जून

​अशी असेल १५ जणांची कार्यकारिणी

​नियोजित पत्रकार संघात एकूण १५ पदांसाठी निवडणूक होणार असून त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:

  • अध्यक्ष: १ पद
  • उपाध्यक्ष: २ पदे
  • महिला कार्याध्यक्ष (राखीव): १ पद
  • सचिव: १ पद
  • सहसचिव: १ पद
  • खजिनदार: १ पद
  • कार्यकारिणी सदस्य: ८ पदे

​मान्यवराची उपस्थिती…

​या कार्यक्रमाची प्रस्तावना पत्रकार सुहास बिर्‍हाडे यांनी केली, तर पत्रकार विजय गायकवाड यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. सुप्रसिद्ध सुसंवादक कुणाल रेगे यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव पाटोळे यांनी या संपूर्ण प्रक्रियेत समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. विजय देसाई आणि राज शर्मा यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर विजय खेतले यांनी शेवटी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *