
नवनिर्वाचित नगरसेवक अनधिकृत बांधकामप्रकरणी आक्रमक भूमिका घेणार का?
पेल्हार विभागाच्या हद्दीत प्रभाग क्रमांक १ मध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामावर सहाय्यक आयुक्त व्हिक्टर डिसोजा मैदानात उतरणार केव्हा?
वसई : विशेष प्रतिनिधी :
विरार पूर्व येथील मांडवी–भामटपाडा गावाच्या परिसरात एक बेकायदेशीर पत्राशेड बांधकाम उभारण्यात आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ग्रामीण भागाला अनधिकृत बांधकामांचा शाप दिवसेंदिवस वाढत चालला असून, अशा बेकायदेशीर बांधकामांमुळे नियोजन, वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
विशेष म्हणजे मांडवी पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्याला उजवीकडे फाटा फुटलेल्या रस्त्यावर, भामटपाडा व मांडवी गावाच्या मधोमध ही अनधिकृत पत्राशेड बांधकामे उभी राहिल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही अधिकृत परवानगी नसताना भूमाफियांनी बिनधास्तपणे ही शेड उभारली असून, शासकीय नियम, विकास आराखडा व कायद्याला खुलेआम धाब्यावर बसवले जात आहे. सदर परिसर हा महापालिकेच्या प्रभाग समिती प्रभाग एफ अर्थात पेल्हार मध्ये येतो. या प्रभागात आता बहुजन विकास आघाडीचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांच्याकडून सदर प्रभागात तत्काळ कारवाईसाठी पालिकेकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच पेल्हार विभागाचे सहाय्यक आयुक्त व्हिक्टर डिसोजा यांनी कारवाईसाठी मैदानात उतरावे अशी मागणी वाढू लागली आहे.
गेल्या साडेपाच वर्षांत प्रशासकीय राजवटीचा गैरफायदा घेत भूमाफियांनी ग्रामीण भागाचे अक्षरशः लचके तोडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, ग्रामीण परिसराचे मूळ स्वरूप बदलत असून भविष्यात अनेक सामाजिक व नागरी समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे बेकायदेशीर पत्राशेड बांधकाम वसई–विरार महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ च्या हद्दीत झाले असून, हा प्रभाग प्रभाग समिती ‘एफ’ अर्थात पेल्हार विभाग अंतर्गत येतो. या विभागाचे सहाय्यक आयुक्त व्हिक्टर डिसोजा यांनी या अनधिकृत बांधकामाचा तात्काळ सोक्षमोक्ष लावून संबंधित भूमाफियांवर मांडवी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक जयंत बसवत, अस्मिता पाटील, सुनंदा पाटील व गजानन पाटील यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून महापालिकेकडे तात्काळ कार्यवाहीसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. ग्रामीण प्रभागाला अनधिकृत बांधकाममुक्त करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घ्यावी,” अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. लोकप्रतिनिधियुक्त राजवट अस्तित्वात आल्यानंतर आता तरी या बेकायदेशीर बांधकामांवर ठोस व तात्काळ कारवाई होईल, असा विश्वास नागरिकांना वाटत आहे.
नागरिकांनी पालिकेकडे या प्रकरणी कठोर पावले उचलण्याची मागणी केली असून, संबंधित भूमाफियांवर फौजदारी कलमांतर्गत गुन्हे दाखल करावेत, तसेच सदर बेकायदेशीर पत्राशेड बांधकाम तात्काळ निष्कासित करावे, अशी ठाम मागणी केली आहे. भविष्यात अशा प्रकारची बांधकामे पुन्हा होऊ नयेत, यासाठी नियमित तपासणी व कडक अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
एकंदर, मांडवी–भामटपाडा परिसरातील हे बेकायदेशीर बांधकाम प्रकरण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसाठी कसोटीचे ठरणार असून, बेलदार विभागाचे सहाय्यक आयुक्त व्हिक्टर डिसोजा आणि बहुजन विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक या प्रकरणावर नेमकी केव्हा आणि कोणती ठोस भूमिका घेतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
