
वसई : प्रतिनिधी
दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते देविदास जयवंत केंगार यांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांना निवेदन सादर केले. दिव्यांगांसाठीच्या सुविधा वाढविणे व त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
महापालिकेच्या ५ टक्के दिव्यांग राखीव निधीचा योग्य व पारदर्शक वापर करावा, दिव्यांग पेन्शनमध्ये वाढ करावी, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांगांना स्टॉल व त्यांचे परवाने देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. तसेच सार्वजनिक इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी लिफ्ट व रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच विशेष रोजगार मेळावे व कौशल्य प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
महापौर अजीव पाटील यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली असून याबाबत आवश्यक त्या पातळीवर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.
दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अधिक प्रभावी पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते देविदास केंगार यांनी व्यक्त केले.
