Oplus_131072

वसईतील जानकीपाडा शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; बदली होऊनही शिक्षकाचा कार्यालयातच ठिय्या

प्रतिनिधी, वसई:

विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकानेच शाळेला दांडी मारून पंचायत समितीच्या कार्यालयात ‘कारकून’ म्हणून ठिय्या मांडल्याचा धक्कादायक प्रकार वसईत उघडकीस आला आहे. वसई तालुक्यातील जानकीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रवींद्र हरेश्वर घरत हे जून २०२३ पासून शाळेत न जाता शिक्षण विभागात अनधिकृतपणे कार्यरत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र घरत यांची बदली जून २०२३ मध्ये जानकीपाडा शाळेत झाली होती. नियमानुसार त्यांनी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिकवणे अपेक्षित असताना, ते बहुतांश वेळ वसई पंचायत समितीच्या शिक्षण विभागात लिपिकाची कामे करण्यात घालवत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पंचायत समिती कार्यालयाचे कोणतेही अधिकृत आदेश नसतानाही हे शिक्षक दिवसभर कार्यालयात बसून प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचे समोर आले आहे.

गंभीर आरोपांची सरबत्ती

तक्रारदार एलायस जोसेफ डिसिल्वा यांनी याप्रकरणी शिक्षणमंत्री, पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीत संबंधित शिक्षकावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत:

  • गोपनीय कामात हस्तक्षेप: शिक्षकांचे वेतन निश्चिती, महागाई भत्त्याची बिले मंजूर करणे आणि शिक्षकांचे समायोजन यांसारखी संवेदनशील कामे संबंधित शिक्षक हाताळत आहेत.
  • दबदबा आणि भीती: या कामाच्या जोरावर शिक्षण विभागात आपला प्रभाव निर्माण केला असून, इतर शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
  • आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप: रजा मंजुरी आणि बिले काढण्यासाठी आर्थिक मागणी केली जात असून, विरोध करणाऱ्यांची बिले जाणीवपूर्वक रोखली जात असल्याचा खळबळजनक आरोपही डिसिल्वा यांनी केला आहे.

प्रशासकीय अनास्था?

पालघर जिल्ह्यात कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी पुरेसे लिपिक असताना एका शिक्षकाकडे ही जबाबदारी का सोपवण्यात आली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. “एकीकडे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त असताना, हजर असलेले शिक्षक कार्यालयात बसून राहत असतील, तर शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा वाजणारच,” अशी टीका स्थानिक स्तरावरून होत आहे.

​या प्रकरणी शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता प्रशासन या ‘कारकुनी’ करणाऱ्या गुरुजींवर काय ॲक्शन घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *