वसई-विरार महापालिकेत रुग्णांच्या जिवाशी खेळ; ‘पेटीट’ औषध घोटाळ्यावर महिना उलटूनही प्रशासन ढिम्म!


वसई: एकीकडे पारदर्शक कारभाराचा डांगोरा पिटणाऱ्या वसई-विरार शहर महानगरपालिकेचा खरा चेहरा आता समोर आला आहे. वसई पश्चिमेकडील डी. एम. पेटीट रुग्णालयात चक्क मुदत संपलेली (Expired) औषधे रुग्णांना दिली जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस येऊन महिना उलटला, तरीही अद्याप दोषींवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या ‘थंड’ भूमिकेमुळे संताप व्यक्त होत असून, आता या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विभागाच्याच पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​मार्च महिन्यात भाजप नगरसेवकांनी पेटीट रुग्णालयाला दिलेल्या अचानक भेटीत औषध भांडारात १० विविध प्रकारची मुदत संपलेली औषधे आढळून आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, ही औषधे आणि चालू औषधे एकाच ठिकाणी ठेवून ती रुग्णांना दिली जात असल्याचे वास्तव समोर आले होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली होती ​समितीने आपला अहवाल सादर करून महिना झाला, तरीही दोषी अधिकाऱ्यांवर केवळ ‘कारण दाखवा’ नोटिशींचा खेळ सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “दोषींनी सादर केलेले खुलासे मुख्य वैद्यकीय विभागाकडे पाठवले असून तिथून सूचना आल्यावर कारवाई करू” असे मोघम उत्तर दिले आहे.​परंतु, मुळात ज्या ‘वैद्यकीय विभागा’च्या नाकाखाली हा भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा सुरू आहे, त्याच विभागाकडे खुलासे पाठवणे म्हणजे ‘चोराच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या’ देण्यासारखे असल्याचे बोलले जात आहे. या विभागातच मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याची चर्चा असल्याने, ही चौकशी पारदर्शक होणार की प्रकरण दडपले जाणार, असा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहे.​प्रशासकीय दिरंगाईच्या विरोधात नगरसेवक अशोक शेळके यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन ढिम्म हलत नसल्याने, त्यांनी आयुक्त आणि पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून येत्या १ मे (महाराष्ट्र दिन) पासून महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात ‘आमरण उपोषणा’चा इशारा दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *