पालघर, २७ जुलै २०२६ (विशेष प्रतिनिधी): २२ आणि २३ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात झालेल्या हाहाकारानंतर जिल्हा प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अखत्यारीतील प्रमुख राज्य महामार्ग क्र. ४ (झाई-बोर्डी-रेवस-रेड्डी) वरील नरपड-आंबेवाडी नाका येथील वाहून गेलेला रस्ता प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांत युद्धपातळीवर दुरुस्त करून पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला आहे.

पालकमंत्र्यांचे निर्देश आणि जिल्हाधिकाऱ्यांचे नियोजन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पालघरचे पालकमंत्री श्री. गणेश नाईक यांनी तातडीने आढावा घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला लवकरात लवकर वाहतूक पूर्ववत करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी संपूर्ण कार्यवाहीवर व्यक्तिगत लक्ष केंद्रित केले. उच्च-स्तरीय पाठपुरावा आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवून देत त्यांनी यंत्रणेला गती दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे PWD ची यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ अवघ्या काही तासांत कामाला लागले.

अशक्यप्राय काम विक्रमी वेळेत पूर्ण पुराच्या तडाख्यामुळे या भागातील अनुक्रमे ६० मीटर आणि ७० मीटर लांबीचे रस्ते पूर्णपणे वाहून गेले होते. सुरुवातीला हे काम आव्हानात्मक वाटत असले तरी, उत्तम नियोजनामुळे ते प्रत्यक्षात उतरवण्यात आले.

  • आपत्कालीन उपाय म्हणून ‘NP-3’ दर्जाचे १२०० मिमी व्यासाचे ह्यूम पाईप्स बसवून पाण्याचा निचरा सुरळीत करण्यात आला.
  • सुमारे ५०० ट्रक खडी, ॲग्रीगेट, बोल्डर्स आणि GSB साहित्याचा वापर करून रस्त्याचा भराव (embankment) पूर्ववत करण्यात आला.
  • या कामासाठी ३ पोकलेन मशिन्स, ४ एक्स्कॅव्हेटर्स, ४० हून अधिक हायवा/डंपर आणि ८ काँक्रीट मिक्सर्सचा प्रभावी वापर करण्यात आला.
  • भविष्यातील सुरक्षेसाठी २.०० मीटर x २.०० मीटर आकाराचा आरसीसी (RCC) बॉक्स कल्व्हर्ट आणि रिटेनिंग वॉल्सच्या (आधार भिंती) कायमस्वरूपी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

चिखले-नावखाडी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात नारपाडप्रमाणेच चिखले-नावखाडी रस्त्यावरील भरावही पुरामुळे वाहून गेला होता. साहित्य वाहतुकीसाठी योग्य मार्ग नसतानाही प्रशासनाने तांत्रिक अडथळे पार करत मनोर, किरात आणि वाडा येथून आवश्यक गौण खनिजे व कल्व्हर्टचे ३० पाईप्स जुळवून आणले. सध्या या रस्त्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून तो लवकरच नागरिकांच्यासेवेसाठी खुला होईल.

अत्यंत प्रतिकूल हवामान आणि मुसळधार पावसाच्या फेऱ्यातही पालघर जिल्हा प्रशासनाने दाखवलेली इच्छाशक्ती आणि गतिशीलता कौतुकास्पद ठरली आहे. आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने पुन्हा एकदा आपले कर्तव्य सिद्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed