Oplus_131072

पालघर, (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाला मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्यामार्फत घरभेटी व आवश्यक पडताळणीची कार्यवाही आता १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत चालणार आहे. जिल्ह्यातील कोणतीही पात्र व्यक्ती मतदार यादीपासून वंचित राहू नये आणि ‘एसआयआर’चे काम शंभर टक्के पूर्ण व्हावे, यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

​मतदार यादीतील प्रत्येक नागरिकाची नोंद अचूक आणि अद्ययावत राहावी, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मोहिमेच्या सुधारित वेळापत्रकानुसार बीएलओ घरभेटी आणि पडताळणीचे काम १७ ऑगस्टपर्यंत पूर्ण करतील. ज्या नागरिकांशी अद्याप संपर्क झालेला नाही किंवा ज्यांनी माहिती दिलेली नाही, त्यांनी नजीकच्या बीएलओ, मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्याशी संपर्क साधून तातडीने कार्यवाही पूर्ण करावी, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मोहिमेचे सुधारित वेळापत्रक एका नजरेत:

  • बीएलओमार्फत घरभेटी व पडताळणी: ३० जून २०२६ ते १७ ऑगस्ट २०२६
  • मतदान केंद्रांची पुनर्रचना पूर्ण करणे: १७ ऑगस्ट २०२६
  • प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे: २४ ऑगस्ट २०२६
  • दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी: २४ ऑगस्ट २०२६ ते २३ सप्टेंबर २०२६
  • दावे-हरकतींवर सुनावणी व निकाली काढणे: २४ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑक्टोबर २०२६
  • अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे: २७ ऑक्टोबर २०२६

​नागरिकांनी आपल्या मतदार नोंदणीची खात्री करून घ्यावी आणि नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती किंवा स्थलांतरासारख्या बाबींसाठी निर्धारित मुदतीत दावे व हरकती दाखल कराव्यात. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद असणे अत्यंत गरजेचे असून, पालघर जिल्ह्यातील ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *