
युवाशक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा, वसई
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य आणि स्मशानभूमी विभागाचा अत्यंत संवेदनशील आणि अमानुष कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. पाचू बंदर येथील हिंदू स्मशानभूमीला चक्क कुलूप लावून कंत्राटी कर्मचारी गायब झाल्यामुळे एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना भर पावसात स्मशानभूमीच्या गेटबाहेर ठेवून द्यावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संतापजनक प्रकारामुळे मृताच्या नातेवाईकांसह स्थानिक वसईकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, बेजबाबदार ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.
हरेश माणक्या चिमटेकर (वय ५४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पाचूबंदर येथील एका मिठागरात काम करत असताना फिट आल्याने किंवा अन्य कारणास्तव हरेश चिमटेकर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने वसई गावातील प्रभाग ‘आय’ (I) अंतर्गत येणाऱ्या सर डी. एम. पेटीट सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
मृत्यूनंतरही नशिबी विटंबना
रुग्णालयातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नातेवाईक आणि स्थानिकांनी अंत्यसंस्कारासाठी हरेश चिमटेकर यांचा मृतदेह पाचू बंदर येथील हिंदू स्मशानभूमीत आणला. मात्र, ऐन पावसाळ्यात स्मशानभूमीच्या मुख्य प्रवेशद्वाराला चक्क मोठे कुलूप लावण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, स्मशानभूमीत कार्यरत असलेला एकही कर्मचारी अथवा सुरक्षारक्षक तिथे उपस्थित नव्हता. अखेर नातेवाईकांना हरेश चिमटेकर यांचा मृतदेह मुख्य गेटबाहेर तशाच मुसळधार पावसात उघड्यावर ठेवून द्यावा लागला. जिवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या सामान्य माणसाच्या मृतदेहाची मृत्यूनंतरही अशी विटंबना पाहावी लागल्याने उपस्थित नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला.
प्रशासकीय यंत्रणा जागी झाली, पण…
हा संतापजनक प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग ‘आय’ मधील स्मशानभूमी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्मशानभूमीचे कुलूप उघडले. प्राथमिक माहितीनुसार, या स्मशानभूमीत कार्यरत असलेले प्रभाकर मेहेर आणि दया तांडेल हे दोन्ही कर्मचारी कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि वरिष्ठांना न कळवता कर्तव्यावरून गायब होते.
कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
”जर दोन्ही कर्मचाऱ्यांना काही अनिवार्य कारणास्तव गैरहजर राहायचे होते, तर त्यांनी आपल्या जागी बदली कर्मचाऱ्याची (Substitute) व्यवस्था करणे आवश्यक होते. संपूर्ण स्मशानभूमीला कुलूप लावून दोन्ही कर्मचारी एकाच वेळी गायब कसे होऊ शकतात? ठेकेदाराचा आपल्या कर्मचाऱ्यांवर काही अंकुश आहे की नाही?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
”हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मानवी हक्कांचे आणि मृतदेहाच्या सन्मानाचे (Right to Dignity after Death) थेट उल्लंघन आहे. मृत्यूनंतरही माणसाचे असे हाल होत असतील तर या प्रशासनाला काय म्हणावे? वसई-विरार महापालिकेचे आयुक्त आणि महापौरांनी या गंभीर प्रकरणात स्वतः लक्ष घालावे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रभाकर मेहेर आणि दया तांडेल यांच्यावर कायदेशीर कारवाई करून, मानवी मूल्यांशी खेळणाऱ्या संबंधित ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाकावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
— स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते, वसई
