विरार: राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, विरारमध्ये एका महत्त्वाच्या सदिच्छा भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आमदार रोहित पवार यांनी वसई-विरारचे बलाढ्य नेते आणि बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा, माजी आमदार हितेंद्र (अप्पा) ठाकूर यांची त्यांच्या विरार येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.यावेळी नालासोपारा विधानसभेचे माजी आमदार क्षितिज ठाकूर आणि बोईसर विधानसभेचे माजी आमदार राजेश पाटील हेदेखील उपस्थित होते. या दिग्गज नेत्यांच्या एकत्र येण्याने पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही केवळ एक सदिच्छा भेट असली तरी यादरम्यान मतदार संघातील विविध सामाजिक प्रश्न, लोकहितार्थ राबवायचे उपक्रम आणि आगामी काळातील राजकीय वाटचाल या संदर्भात नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. कायद्याच्या चौकटीत राहून आणि सनदशीर मार्गाने जनहिताची कामे कशी पुढे नेता येतील, यावरही या बैठकीत मंथन झाल्याचे समजते.या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या शुभेच्छा हीच पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मोठी प्रेरणा ठरते, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. हितेंद्र ठाकूर यांच्यासारख्या अनुभवी नेत्याच्या अनुभवाचा फायदा जनहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच होईल, असा विश्वासही यावेळी दर्शवण्यात आला.सध्याच्या बदलत्या राजकीय वातावरणात या नेत्यांची ही सकारात्मक चर्चा आगामी काळात काय नवीन समीकरणे घेऊन येते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *