
वसई (प्रतिनिधी): प्रभाग क्रमांक १३ मधील वाघोली येथील वाघेश्वरी मंदिर परिसरातील गार्डनमध्ये खराब झालेल्या व्यायाम साहित्याची दुरुस्ती करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार नवीन साहित्य बसविण्यात आले आहे. स्थानिक नगरसेविका ॲड. दिप्ती चेतन भोईर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक व नियमित व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकनेते हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर, महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस व स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न मार्गी लावला गेला. वाघेश्वरी मंदिर परिसरातील उद्यानातील जुने व नादुरूस्त व्यायाम साहित्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही बाब परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेविका ॲड. दिप्ती भोईर यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत त्यांनी संबंधित महानगरपालिका विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून त्यांनी बुधवार, दिनांक ०२ सप्टेंबर २०२६ रोजी खराब साहित्याची दुरुस्ती करून घेतली आणि नव्याने साहित्य बसविण्याचे काम पूर्ण केले. तसेच, महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत संपूर्ण गार्डन परिसराची स्वच्छताही करून घेण्यात आली.
नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष स्थळावर जाऊन सोडवण्याच्या या कार्यपद्धतीबद्दल स्थानिक नागरिकांनी व ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेविका ॲड. दिप्ती भोईर यांचे आभार मानले आहेत. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आणि परिसराच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, अशी प्रतिक्रिया यावेळी नगरसेविका ॲड. दिप्ती भोईर यांनी दिली.
