
वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘आय’ अंतर्गत येणाऱ्या पाचू बंदर येथील स्मशानभूमीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या या स्मशानभूमीतील नारळाच्या झाडांवरून सुट्टीच्या दिवशी काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी परस्पर नारळ खाली उतरवून ते विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, आपल्याला कसलीही कल्पना नसल्याचे सांगत त्यांनी हात वर केले आहेत. तर दुसरीकडे, नारळ चोरी करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना जा विचारले असता, “आम्ही आमच्या स्वतःच्या मर्जीने नारळ तोडले आहेत,” असे अत्यंत अरेरावीचे आणि मुजोरीचे उत्तर त्यांनी दिले आहे.स्मशानभूमीच्या आवारातील झाडे ही महानगरपालिकेची म्हणजेच सार्वजनिक मालमत्ता आहेत. कुठल्याही शासकीय किंवा पालिका जागेवरील फळझाडांची विनापरवानगी तोडफोड करणे आणि त्यांची परस्पर विक्री करणे हा भारतीय न्याय संहितेनुसार चोरीचा व शासकीय संपत्तीच्या अपहारचा गुन्हा ठरू शकतो. हे कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर (Contract basis) काम करत असल्याने, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. मात्र, ठेकेदाराचे दुर्लक्ष आणि वचक नसल्यामुळेच हे कर्मचारी स्वतःलाच त्या ठिकाणाचे मालक समजत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.एका बाजूला महापालिका प्रशासनाचे अधिकारी आपल्या हद्दीत काय चालले आहे याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहेत, तर दुसऱ्या बाजूला कंत्राटी कर्मचारी कायद्याला आणि प्रशासनाला न जुमानता मनमानी करत आहेत. यामुळे महापालिकेचा वचक संपला असून प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, केवळ संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईच नव्हे, तर ज्या हलगर्जी ठेकेदाराच्या अंतर्गत हे कर्मचारी काम करत आहेत त्या ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट (Blacklist) करण्याची तीव्र मागणी लावून धरली आहे. सार्वजनिक मालमत्तेची अशी खुलेआम लूट करणाऱ्यांवर महापालिका प्रशासन काय कारवाई करणार, याकडे आता संपूर्ण वसईकरांचे लक्ष लागले आहे.




