नालासोपारा(प्रतिनिधी)-पालघर लोकसभा मतदारसंघात युतीचे राजेंद्र गावित व बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात थेट लढत होत आहे.दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रविवारी बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी नालासोपाऱ्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भाजप-शिवसेनेवर कडाडून टीका केली. निवडणुका आल्या की ईडीची धमकी दाखवतात, पण ईडीला घाबरायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? असा टोला हितेंद्र ठाकूर यांनी मारला. नालासोपारा पूर्वेकडील दामोदर सभागृहात बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांच्या प्रचारार्थ आज सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
‘निवडणुका आल्या की ईडीची धमकी दाखवतात, पण ईडीला घाबरायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? मी जेलमध्ये जाऊन आलोय. भुजबळांची कोठडी खाली आहे, तिथे जाऊन राहीन. घाबरायला मी उद्धव ठाकरे नाही तर हितेंद्र ठाकूर आहे’असा टोला हितेंद्र ठाकूर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
तसेच, निवडणूक आली की मी ५ ते १५ कोटी रुपयांना विकणारा हितेंद्र ठाकूर नाही. मी मेल्यावर मला चंदनाच्या लाकडात जाला, असेही ठाकूर म्हणाले.’पोटनिवडणुकीत कोथळा बाहेर काढायला निघाले होते, मला वाटले पुन्हा बाळासाहेब अवतरले की काय? पण हे तर चक्क म्याव निघाले, म्याव म्हणजे त्या मांजराचा अपमान होईल, त्यामुळे ती म्याव म्हणजे ‘माननीय उद्धव’ ठाकरे आहे. बाळासाहेबांचं पोरग कसं मर्दासारखा वागलं पाहिजे, पण याच्या पुढे एक प्रश्नचिन्हच आहे’, असा घणाघात हितेंद्र ठाकूर यांनी केला.’वसई, विरार नालासोपारा हा बविआचा बालेकिल्ला आहे, या किल्ल्यात सुरूंग लावण्यासाठी शिवसेना भाजपाने मोठी ताकद पणाला लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरारमधील गुंडगिरी संपविण्याची अनेक सभांमध्ये वक्तव्य केले आहे. पण ५ वर्षे त्यांची सत्ता आहे, त्यांनी काय बांगड्या भरल्या होत्या काय? का संपवली नाही गुंडा गर्दी, बामणाच्या मुहूर्ताची वाट पाहत होते काय?” असा प्रतिप्रश्न ठाकूर यांनी मुख्यमंत्री यांना केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed