नालासोपारा : विरार पश्चिमेकडील आगाशी गावातील पुरापाडा येथे असलेले एकमेव जुने मैदान महानगरपालिकेने लग्न समारंभासाठी भाड्याने दिल्याने तब्बल १५ दिवसांपासून मैदानावर मंडप उभा आहे. तसेच मैदानात तेथे कचऱ्याचे ढीग साचलेले असल्याने खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे. लग्न सोहळ्यासाठी फक्त तीन दिवसांची लेखी परवानगी मिळालेली असताना तब्बल १५ दिवस हा मंडप कसा काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना आणि खेळाडूंना पडला आहे.

खेळाडूंना खेळण्यासाठी मैदाने तयार करून त्यांची चांगली देखभाल ठेवणे आवश्यक असते. पण अशी मैदाने खेळण्यासाठी उपलब्ध न करता ती भाड्याने लग्न सोहळ्यांना कशी काय दिली जातात, असा संतप्त सवाल खेळाडू विचारीत आहेत. पुरापाडा येथील या जुन्या मैदानात व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बॅटमिंटन असे अनेक खेळ खेळले जातात. हे मैदान पावसाळ्यानंतर लायन्स क्लबकडून व्यवस्थित भराव वगैरे टाकून लेव्हल केले जाते.

त्यानंतर ५ ते ६ दिवस त्याचे कार्यक्रम याच मैदानावर घेतले जातात. त्यानंतर हे मैदान सर्वांसाठी खुले केले जाते.
लायन्स क्लब या मैदानाची देखरेख, साफसफाई करते. मात्र महापालिका याकडे कानाडोळा करत असून खेळाडूंसाठी काहीही व्यवस्था करीत नाही, असा आरोप खेळाडूंकडून केला जात आहे.

सदर मैदान मुलांना खेळण्यासाठी असतानाही महापालिका या मैदानाची निगा न राखता लग्न समांरभ व इतर सोहळ्यांसाठी हे मैदान भाड्याने का देते?
संतोष सावंत, खेळाडू

याबाबत कालच महापालिकेच्या कार्यालयात बैठक घेतली असून हे मैदान यापुढे कोणत्याही कामासाठी भाड्याने न देण्याचे ठरवले आहे. ज्याच्या लग्न सोहळ्यामुळे मैदानावर कचºयाचे ढीग झाले होते. त्यांच्या डिपॉझिटमधून साफसफाईसाठी लागलेला खर्च कापला जाणार असून तो कापून परत करण्याचे सहाय्यक आयुक्तांना सांगितले आहे.
सखाराम महाडिक, सभापती,
वसई-विरार महापालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *