१३ जुलैला ट्रक पकडला… गोदाम सील झाले… ३५० गोणी गहू जप्त… तरी दोन दिवस FIR नव्हता; अखेर १५ जुलै रोजी रात्री ११.१५ वाजता गुन्हा दाखल

प्रतिनिधी | युवाशक्ती एक्सप्रेस | वसई

वसई तालुक्यातील संशयास्पद सरकारी धान्य वाहतूक प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. १३ जुलै २०२६ रोजी खानिवडे ब्रिज परिसरात गुजरातच्या दिशेने जाणारा संशयास्पद सरकारी धान्याने भरलेला आयशर ट्रक (क्रमांक DD-01-V-9672) पकडण्यात आला. ट्रकमध्ये तब्बल ३५० गोणी गहू आढळून आला. त्याच दिवशी नायगाव (बाफणे) येथील संशयित गोदामाची तपासणी करून पंचनामा करण्यात आला, गोदाम सील करण्यात आले आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, एवढी मोठी कारवाई होऊनही दोन दिवस कोणताही FIR दाखल झाला नव्हता.

या संपूर्ण प्रकरणाचा युवाशक्ती एक्सप्रेसने पहिल्या दिवसापासून सातत्याने पाठपुरावा केला. संशयास्पद धान्य वाहतुकीचे वृत्त प्रसिद्ध करत संबंधित प्रशासन, पुरवठा विभाग आणि पोलीस यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. अखेर या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर १५ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजता मांडवी पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पुरवठा विभागाची तक्रार; तपासात उघड झाले धक्कादायक तपशील

या प्रकरणात वसई तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी भागवत मोहन सोनार यांनी सरकारतर्फे तक्रार दाखल केली आहे. FIR नुसार, तहसीलदारांच्या सूचनेनंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक तपास केला. त्यानंतर नायगाव (बाफणे) येथील संशयित गोदामाची पाहणी करण्यात आली.

पंचांसमक्ष गोदामाचे कुलूप उघडून तपासणी केली असता आत तांदळाच्या गोण्या, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि जमिनीवर विखुरलेले गव्हाचे दाणे आढळून आले. संशय अधिक बळावल्याने पंचनामा करून संपूर्ण गोदाम सील करण्यात आले.

‘पियुष’च्या गोदामातून धान्य भरल्याची चालकाची कबुली

FIR मधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ट्रक चालक मोहम्मद मोबीन आझाद उल्ला (रा. वडाळा, मुंबई) याने चौकशीदरम्यान हे धान्य नायगाव (बाफणे) येथील ‘श्री. पियुष’ यांच्या गोदामातून भरण्यात आल्याचे सांगितले. तसेच हा माल सुरत (गुजरात) येथे घेऊन जात असल्याची माहितीही त्याने अधिकाऱ्यांना दिली.

याचबरोबर चालकाने धान्याचे बिल सादर केले. मात्र, त्या बिलावरील QR Code स्कॅन केल्यानंतर कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. चालकालाही मालाचा मालक, खरेदीदार किंवा व्यवहाराबाबत समाधानकारक माहिती देता आली नाही. त्यामुळे संपूर्ण व्यवहार संशयास्पद असल्याचे स्पष्ट होताच ट्रक आणि त्यातील धान्य जप्त करण्यात आले.

₹१९.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त; तीन नमुने प्रयोगशाळेत

कारवाईदरम्यान ₹४.३७ लाख किमतीचा ३५० गोणी गहू आणि ₹१५ लाख किमतीचा आयशर ट्रक असा एकूण ₹१९.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त धान्यातून तीन नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठविण्यात आले असून ट्रकसह संपूर्ण मुद्देमाल शासकीय गोदामात जमा करण्यात आला आहे.

चालकावर गुन्हा… पण ‘पियुष’, वाहनमालक आणि मुख्य सूत्रधार कुठे?

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, चालकाने स्वतः ‘श्री. पियुष’ यांच्या गोदामातून धान्य भरल्याचे सांगितले, गोदामाची तपासणीही झाली, ते सीलही करण्यात आले, तरीही FIR मध्ये आरोपी म्हणून केवळ चालक मोहम्मद मोबीन आझाद उल्ला याचाच समावेश करण्यात आला आहे.

‘श्री. पियुष’ यांची भूमिका नेमकी काय? धान्याचा मालक कोण? ट्रकचा मालक कोण? धान्य सुरतला कोणाच्या सांगण्यावरून पाठविले जात होते? हा व्यवहार कोणाच्या आदेशाने सुरू होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे अपेक्षित असताना, अद्याप संबंधित व्यक्तींवर कोणतीही गुन्हेगारी कारवाई झालेली नाही.

दोन दिवस FIR का नव्हता?

१३ जुलै रोजी ट्रक पकडला गेला… त्याच दिवशी गोदामावर कारवाई झाली… पंचनामे झाले… लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला… तरीही १५ जुलैच्या रात्री ११.१५ वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

या दोन दिवसांच्या कालावधीत नेमके काय घडले? कारवाईला विलंब का झाला? या कालावधीत संबंधितांना दिलासा मिळाला का? मुख्य सूत्रधारांपर्यंत तपास पोहोचण्याआधीच पुरावे नष्ट करण्याची संधी मिळाली का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

युवाशक्ती एक्सप्रेसचा पाठपुरावा सुरूच

या प्रकरणात FIR दाखल होणे हा निश्चितच महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, युवाशक्ती एक्सप्रेसच्या मते ही कारवाई केवळ सुरुवात आहे. चालकावर गुन्हा दाखल करून तपास थांबता कामा नये. ‘श्री. पियुष’, वाहनमालक, संबंधित गोदामाशी संबंधित व्यक्ती, धान्य पुरवठा साखळीतील सर्व संबंधित आणि या संपूर्ण व्यवहारामागील मुख्य सूत्रधारांवर कायदेशीर कारवाई होणे तितकेच आवश्यक आहे.

सरकारी रेशनचे धान्य राज्याबाहेर पाठविण्याचा प्रयत्न होता का? या प्रकरणामागे संघटित रॅकेट कार्यरत आहे का? आणि चालकापर्यंतच तपास मर्यादित राहणार की मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणार? या प्रश्नांची उत्तरे आता तपास यंत्रणेलाच द्यावी लागणार आहेत.

युवाशक्ती एक्सप्रेस या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा पुढेही सुरू ठेवणार असून, या प्रकरणातील प्रत्येक घडामोड वाचकांपर्यंत पोहोचवत राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *