
प्रतिनिधी , वसई-विरार:
“वसई-विरार शहर गेल्या पाच दिवसांपासून पाण्यात बुडाले असताना महापालिका प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. नागरिकांचे हाल थांबवण्यासाठी आणि पालिकेचा विस्कळीत झालेला गाडा रुळावर आणण्यासाठी आता वसई-विरार महापालिकेला तुकाराम मुंढे यांच्यासारख्याच धडक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज आहे,” अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे.
शहरातील गंभीर पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)शिवसेना जिल्हा प्रमुख प्रथमेश राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून विद्यमान आयुक्तांच्या बदलीची थेट मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या मागणीला युवाशक्ती कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा रुबीना मुल्ला यांनीही जाहीर पाठिंबा देत पालिका प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे.
वैद्यकीय मदतीअभावी मृत्यूचा गंभीर आरोप
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातील दाव्यानुसार, वसईतील अनेक निवासी संकुले आणि ग्रामीण भागातील नागरी वस्त्या गेल्या पाच दिवसांपासून पूर्णपणे पाण्याखाली आहेत. वीजपुरवठा खंडित झाला असून पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. पूरग्रस्तांना वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे काही नागरिकांना हृदयविकाराचे झटके आले, तर काही वृद्ध नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा अत्यंत गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
अधिकारी रस्त्यावर का उतरले नाहीत?
”जनता पुरात होरपळत असताना महापालिकेचे साहाय्यक आयुक्त, उपायुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त यांपैकी एकही जबाबदार अधिकारी मदतीसाठी रस्त्यावर उतरलेला दिसला नाही,” असा थेट तोफखाना प्रथमेश राऊत यांनी पत्राद्वारे डागला आहे. विद्यमान आयुक्त पूर व्यवस्थापनात पूर्णतः निष्क्रिय ठरल्याचे सांगत, नागरिकांच्या रोषाला प्रशासकीय अनास्थाच कारणीभूत असल्याचा सूर उमटत आहे.
मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
वसईकर जनतेला तात्काळ दिलासा देण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करून अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे कठोर निर्देश द्यावेत.
पूरपरिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या विद्यमान आयुक्तांची त्वरित बदली करावी.
वसई-विरार पालिकेचा कारभार सुधारण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या सक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची आयुक्तपदी नियुक्ती करावी.
”वसई-विरारमधील जनता सध्या नरकयातना भोगत आहे. अशा वेळी प्रशासकीय शिस्त आणि जनतेला तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी तुकाराम मुंढेंसारख्याच कणखर अधिकाऱ्याची पालिका आयुक्त म्हणून गरज आहे. प्रथमेश राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली ही मागणी अत्यंत योग्य असून, युवाशक्ती कामगार संघटना या मागणी पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”
— रुबीना मुल्ला (संस्थापक अध्यक्षा, युवाशक्ती कामगार संघटना)
या पत्रावर आणि तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीच्या या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालय काय पावले उचलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
