
वसई-विरार (विशेष प्रतिनिधी): एकीकडे पारदर्शक प्रशासनाचा डांगोरा पिटला जात असताना, दुसरीकडे वसई-विरारच्या भूमीवर खाण माफियांचे ‘खूनी’ तांडव सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अवैध उत्खननाची तक्रार करण्यासाठी गेलेल्या RTI सामाजिक कार्यकर्ता खाण माफियांनी भरदिवसा प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे, ज्या महसूल विभागाच्या ‘मंडळ अधिकाऱ्या’समोर हा प्रकार घडला, त्यांची भूमिका संशयास्पद असल्याने आता प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार क्षेत्रातील खाण माफियांच्या बेसुमार उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याच्या तक्रारी वारंवार महसूल विभागाकडे करण्यात आल्या होत्या. याच तक्रारीच्या पंचनाम्यासाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी आणि तक्रारदार RTI सामाजिक कार्यकर्ता घटनास्थळी गेले होते. मात्र, तिथे दबा धरून बसलेल्या खाण माफियांच्या टोळीने तक्रारदारावर लाठ्या-काठ्या आणि दगडांनी भीषण हल्ला चढवला. या रक्तरंजित हल्ल्यात तक्रारदाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या संपूर्ण प्रकरणात महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जेव्हा हा हल्ला झाला, तेव्हा सोबत असलेले मंडळ अधिकारी आणि कर्मचारी नेमके काय करत होते? त्यांनी तक्रारदाराला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही? की ‘लक्ष्मी’ दर्शनामुळे माफियांना हे कृत्य करण्याचे अभय मिळाले होते? असे संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, स्थानिक पत्रकारांनी आणि सामाजिक संस्थांनी या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. जोपर्यंत दोषी खाण माफियांसह कर्तव्यात कसूर करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा पवित्रा सामाजिक कार्यकर्ता यांनी घेतला आहे.
“एका पत्रकाराने किंवा जागरूक नागरिकाने तक्रार करणे हा गुन्हा आहे का? जर शासकीय पंचनाम्यावेळीच लोकांच्या हत्या होणार असतील, तर तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी खुर्च्या सोडाव्यात. हा केवळ खून नसून प्रशासकीय व्यवस्थेचे मरण आहे.”
— स्थानिक सामाजिक कार्यकर्ते
खाण माफियांना पंचनाम्याची वेळ आधीच कुणी सांगितली?
हल्ला होत असताना महसूल पथकाने पोलिसांना तातडीने का बोलावले नाही?
वसई-विरारमधील अवैध उत्खननाचे ‘मास्टरमाईंड’ राजकीय वरदहस्तामुळे मोकाट आहेत का?
या प्रकरणामुळे आता वसईच्या महसूल विभागात असलेले ‘अर्थपूर्ण’ लागेबांधे चव्हाट्यावर आले असून, पोलीस प्रशासन आता या ‘खाकी आणि खादी’च्या संगनमतावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
