Oplus_131072

वसई प्रतिनिधी :

वसई-विरार आणि मीरा-भाईंदर परिसरात अमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांनी सुरू केलेली मोहीम तीव्र केली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्ष-२ च्या पथकाने विरार पूर्व भागात सापळा रचून एका संशयित तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल ५ लाख ७४ हजार ५१० रुपये किमतीचा १० किलो ८७ ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे विरार परिसरातील ड्रग्ज माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आलोक कृष्णा पांडे (वय २२ वर्षे, रा. वाकणपाडा, नागपाडा पूर्व, ता. वसई, जिल्हा पालघर) असे आहे.

​औद्योगिक वसाहतीत रचला सापळा

​अंमली पदार्थ विरोधी कक्ष-२ चे पथक गुरुवारी, १४ मे २०२६ रोजी विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान विरार पूर्वेकडील चंदनसार, गागशपाडा येथील एच.डी.आय.एल. इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात एक इसम संशयास्पद रित्या फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. सदर इसम हा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी तिथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी दोन पंचांसमक्ष सापळा रचला.

​१० किलोहून अधिक गांजा हस्तगत

​काही वेळातच पोलिसांना तिथे संशयित आरोपी आलोक पांडे आढळून आला. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे असलेल्या गोणीमध्ये १० किलो ०८७ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. बाजारात या जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत ५,७४,५१०/- रुपये एवढी आहे. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला असून आरोपीविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कामगिरी

​ही धडक कारवाई मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयचे पोलीस आयुक्त श्री. मधुकर पांडे, अपर पोलीस आयुक्त श्री. श्रीकांत पाठक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अविनाश अंबुरे, आणि सहा. पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

​अंमली पदार्थ विरोधी कक्ष-२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश पाटिल, सहा. पोलीस निरीक्षक सागर शिंदे (गुन्हे शाखा कक्ष-३), सहाय्यक फौजदार राजू भोईर, उमेश गवई, पोलीस हवालदार आसिफ मुल्ला, अमित चव्हाण, सुनील वाणी, सुधीर नरळे, स्वप्निल मोहिते, राजकुमार गायकवाड आणि अजित मेटे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून आरोपीला गजाआड केले. या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास विरार पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *