
वृत्तसेवा | वसई
वसई पश्चिमेकडील पापडी ते बाभोळा चौकी दरम्यानचा रस्ता सध्या तीव्र वाहतूक कोंडीच्या विळगात सापडला असून, सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यालगत अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या सेकंड हँड गाड्या, शुक्रवार बाजारातील बेकायदेशीर थाटणी आणि गॅरेजेसच्या मुजोरीमुळे येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. एका बाजूला वसई-विरार शहर महानगरपालिकेने (VVCMC) नोटिसा बजावूनही प्रत्यक्ष कारवाईत चालढकल होत आहे, तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे संतप्त वसईकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुख्य समस्या आणि अतिक्रमणाचा ब बडगा: पापडी ते बाभोळा चौकी मार्गावर अनेक ठिकाणी सेकंड हँड चारचाकी वाहने थेट रस्त्यावरच विक्रीसाठी किंवा पार्किंगच्या नावाखाली उभी केली जात आहेत. परिणामी, रहदारीचा रस्ता अत्यंत संकुचित झाला आहे. त्यातच, विशेषतः शुक्रवार बाजाराच्या दिवशी रस्त्यावर भरणाऱ्या भाजी मार्केटमुळे आणि रस्त्यालगत सुरू असलेल्या गॅरेजेसच्या बेकायदेशीर कारभारामुळे पादचाऱ्यांना चालणेही ਮੁश्कील झाले आहे. यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाने कागदोपत्री नोटिसा काढल्या असल्या, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई जमिनीवर झालेली नाही.
विद्यार्थ्यांवर कारवाई, पण माफियांच्या पार्किंगवर डोळेझाक? स्थानिक वाहतूक हवालदारांकडून केवळ टी.बी. कॉलेज आणि न्यू इंग्लिश कॉलेज परिसरात लहान वयाचे महाविद्यालयीन विद्यार्थी दिसले की त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, डी-मार्ट ते संपूर्ण परिसरापर्यंत रस्त्यावर बेछूटपणे होणाऱ्या अवैध पार्किंगवर पोलीस जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत. विशेष म्हणजे, या परिसरातील रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंगच्या नावाखाली वसुली नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

