
विरार | प्रतिनिधी
वसई-विरार महानगरपालिकेच्या नंदाखाल (कोफराड) येथील उद्यानाच्या देखभालीसाठी महिला बचत गटाला देण्यात आलेल्या ठेक्याबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून संपूर्ण महानगरपालिकेतील १४४ उद्यानांच्या ठेक्यांचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निर्भय जनमंच संस्थेचे कार्यकारिणी सदस्य जॉन परेरा यांनी केली आहे.
जॉन परेरा यांनी या संदर्भात वारंवार लेखी तक्रारी, ई-मेल तसेच माहिती अधिकार कायद्याअंतर्गत पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी याबाबत आयुक्तांना पुन्हा निवेदन सादर करून तातडीने चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित महिला बचत गटातील काही सदस्य स्वतः उद्यानाची देखभाल न करता हे काम इतर कंत्राटी व्यक्तींमार्फत करून घेत असल्याचा आरोप आहे. तसेच, शासनाच्या महिला बचत गट योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा असताना, प्रत्यक्षात आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांनाच लाभ मिळाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तक्रारीत ठेका मंजूर करताना पात्रतेची पडताळणी झाली का, कोणते निकष लावण्यात आले आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होती का, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रकरणात प्रशासनाने वारंवार तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या
नंदाखाल (कोफराड) येथील उद्यानाच्या ठेक्याची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करावी.
वसई-विरार महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व १४४ उद्यानांच्या ठेक्यांची स्वतंत्र तपासणी करावी.
चौकशीत गैरव्यवहार अथवा नियमभंग आढळल्यास संबंधित ठेका तात्काळ रद्द करावा.
दोषी अधिकारी व संबंधितांवर लागू कायद्यांनुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी.
संबंधित ठेका पात्र व गरजू महिला बचत गटाला देण्यात यावा.
महिला बचत गटांना देण्यात आलेल्या सर्व ठेक्यांचे लेखापरीक्षण करून शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजू महिलांपर्यंत पोहोचत आहे की नाही, याची खातरजमा करावी.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत वसई-विरार महानगरपालिका किंवा संबंधित महिला बचत गटाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

