
वृत्तसेवा, विरार: अतिवृष्टी, जलभराव आणि अंधाराच्या संकटातून वसई-विरारमधील जनजीवन कसेबसे पूर्वपदावर येत असतानाच, आता स्थानिक नागरिकांवर महावितरणने थेट वाढीव वीजबिलांचा ‘शॉक’ दिला आहे. “दरमहा घरभाडे भरावे, मुलांची शाळा-ट्युशनची फी द्यावी, घरचा किराणा आणावा की घरभाड्यापेक्षाही जास्त आलेले वीजबिल भरावे?” असा संतप्त सवाल आता सामान्य वीजग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे. नवीन ‘स्मार्ट मीटर’ ही स्मार्ट पद्धतीने सर्वसामान्यांची खिसेकापू करणारी मशीन आहे, अशा शब्दांत नागरिकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
बजेट कोलमडले: वीजबिल थेट ५ ते ८ हजारांवर
वसई-विरारमध्ये छोट्या-मोठ्या नोकऱ्या करून महिन्याला जेमतेम २० हजार रुपयांपर्यंत पगार मिळवणारा एक मोठा वर्ग आहे. या उत्पन्नातून सुमारे ७ हजार रुपये घरभाडे, ५ हजार रुपये किराणा आणि ५ हजार रुपये मुलांच्या शिक्षणावर खर्च होतात. अशा वेळी संपूर्ण महिन्याचे बजेट १७ हजार रुपयांच्या घरात जाते. पूर्वी ज्या घरात लाईट, पंखा, टीव्ही आणि फ्रिज अशा मर्यादित वापरामुळे १५०० रुपयांपर्यंत बिल येत होते, तिथे आता सक्तीने लावण्यात आलेल्या ‘स्मार्ट मीटर’मुळे थेट ४ हजार, ५ हजार ते अगदी ८ हजार रुपयांपर्यंत बिले येत आहेत.
विशेष म्हणजे, या वाढीव बिलांबाबत तक्रार करण्यासाठी वीज ग्राहक महावितरणच्या कार्यालयात गेल्यास, “आधी बिल भरा, मग तक्रार करा” अशी जाचक भूमिका अधिकाऱ्यांकडून घेतली जाते. तक्रार करूनही बिल कमी होईल की नाही याची शाश्वत हमी दिली जात नाही. कधी युनिट्स जास्त झाल्याचे, तर कधी अंतर्गत वापराचे कारण देऊन ग्राहकांची बोळवण केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
विविध स्तरातून उमटल्या तीव्र प्रतिक्रिया:
या वाढीव बिलांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या जनतेच्या बाजूने आता सामाजिक आणि राजकीय संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे:
- भ्रष्टाचाराचे ऑडिट करा: विनायक खरडे (शंभूराजे मिशन) “महावितरणचा हा सावळा गोंधळ नसून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असलेली खुली लूट आहे. शासनाने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून सक्षम अधिकाऱ्यांमार्फत तातडीने ऑडिट करणे गरजेचे आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी न्यायालयीन चौकशीसह जनहित याचिका (PIL) दाखल होणे आवश्यक आहे.”
- मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा: चंद्रशेखर गुंजारी (मनसे उपशहर अध्यक्ष, नालासोपारा) “गेल्या दोन महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात अघोषित वीज कपात सुरू आहे. नागरिक आधीच त्रस्त असताना त्यांच्यावर जबरदस्तीने स्मार्ट मीटर लादले जात आहेत. यामुळे बिले दुप्पट येत असून लोकांचे जगणे असह्य झाले आहे. महावितरणने वेळीच या जनआक्रोशाची दखल घेतली नाही, तर मनसेच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल.”
- बिलांना तात्काळ स्थगिती द्या: रोहित रमेश सासणे (जिल्हा सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) “पूरपरिस्थितीमुळे अनेक दिवस घरात अंधार होता, पुरवठा खंडित होता, मग मीटर फिरलेच कसे? हा सर्वसामान्यांच्या खिशावर मारलेला दरोडा आहे. आमची स्पष्ट मागणी आहे की, वाढीव वीजबिलांना तात्काळ स्थगिती देऊन याची निष्पक्ष चौकशी व्हावी. तसेच, वीज खंडित असलेल्या कालावधीतील बिले पूर्णपणे माफ करावीत, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू.”
- हा तर आधुनिक ‘लगान’: गणेश शशिकांत लाड (संस्थापक/अध्यक्ष, उत्कृष्ट प्रतिष्ठान) “इंग्रज गेले तरी आज करांच्या रूपाने जनतेकडून ‘लगान’ वसूल केला जात आहे. अतिवृष्टीमुळे लोकांचा रोजगार बुडाला असताना, पूर्वी ३००-४०० रुपये येणारे बिल आता थेट ५ ते १० हजारांवर गेले आहे. जनता जर स्मार्ट मीटर नाकारत आहे, तर प्रशासनाकडून ही सक्ती नेमकी कोणासाठी आणि कशासाठी?”
नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
या संदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. अधिकाऱ्यांच्या या मौनामुळे नागरिकांमधील संताप अधिकच वाढला आहे. “स्मार्ट मीटर हटवा, वीजबिल कमी करा” अशी मागणी करत आता वसई-विरारमधील त्रस्त नागरिक एकत्र येत असून, कायद्याच्या चौकटीत राहून तीव्र धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा जनतेने दिला आहे.
