
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिला जाणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार” यंदा डॉ. संदेश वाघ यांना जाहीर करण्यात आला आहे. आंबेडकरवादी चळवळीतील त्याच्या मोलाच्या योगदानाबद्दल हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येत आहे.
या पुरस्कारामध्ये ₹७५,००० रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र यांचा समावेश आहे. या पुरस्कारामुळे ते काही शासकीय सवलतीसही पात्र ठरणार आहेत.
डॉ. वाघ हे कर्मवीर दादासाहेब वाघ व शांताबाई वाघ यांचे सुपुत्र असून, त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोगावर सदस्य सचिव म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सध्या ते मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक आहेत.
डॉ. वाघ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बौद्ध धम्म, आणि इतिहास विषयावर इंग्रजी, मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांनी फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस, नेपाळ, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका आदी देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आयोजन व प्रतिनिधीत्व केले आहे.
ते भारत सरकारच्या ICHR (आय.सी.एच. आर.) संस्थेच्या पश्चिम भारताचे समन्वयक म्हणूनही कार्यरत होते. तसेच महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समिती, आकस्मिकता योजना समिती आणि महात्मा फुले लेखन प्रकाशन समितीवर त्यांनी सदस्य म्हणून योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वरील अत्याचार: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम यांची अंमलबजावणी आणि वस्तुस्थिती या ह्यावर त्यांनी सर्वात मोठा 3000 पानाचा संशोधन प्रकल्प केंद्र सरकारला सादर केला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम मध्ये आरक्षण धोरणाची अमलबजावणी करण्याकरता त्यांनी सरकारी समिती पुढे लेखी व मौखिक साक्ष दिली आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या करता पदोन्नती मध्ये आरक्षण बाबत ते संबंधित असलेल्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहास व पुरातत्त्व शास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख म्हणुन त्यांनी धुरा निभावली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,मुंबई विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील इतिहास अभ्यास मंडळावर सदस्य म्हणुन कार्य करताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकर, बौद्ध धम्म, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, सामाजिक प्रश्न इत्यादी संदर्भात अभ्यासक्रम पदवी व पदव्युत्तर करता तयार केले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध धम्म, स्पर्धा परीक्षा या संदर्भात त्यांनी 500 च्या आसपास परिषदा, चर्चासत्र यांचे आयोजन केले आहे. ते आंबेडकरवादी इतिहास संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
राज्य शासनाकडून पुरस्कार जाहीर करून डॉ. वाघ यांचा गौरव करण्यात आल्याने सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.