
https://youtu.be/8vN7kU_bizo?si=7Q_SgoqeGI5fGfNi
वसई (प्रतिनिधी) – कामगार उपआयुक्त, पालघर यांच्या कार्यालयात २५ तारखेला होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वसई (पूर्व) येथील युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये हाऊसकिपींग कर्मचाऱ्यांना कामावरून रोखण्यात आल्याचा आरोप पुढे आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी कॉलेज प्रशासनावर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेण्याचा दबाव टाकल्याची तक्रार केली आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते अनेक वर्षांपासून कॉलेजमध्ये कार्यरत असून अलीकडेच ते युवाशक्ती कामगार संघटना या संघटनेचे सभासद झाले आहेत. यानंतर कामगार उपआयुक्त कार्यालयात प्रकरणाची सुनावणी निश्चित झाली. मात्र, सुनावणीपूर्वीच काही कर्मचाऱ्यांना कामावरून रोखण्यात आले असून कॉलेज परिसरात प्रवेश देण्यास मनाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“स्वाक्षरी करा, अन्यथा काम दिले जाणार नाही,” अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याचेही कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच अनेक वर्षे सेवा करूनही आवश्यक वैधानिक सुविधा आणि सुरक्षा न दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भविष्यात खोटे आरोप लावून कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्यांनी कामगार उपआयुक्त तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. “आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून न्यायासाठी लढा देणार आहोत. मात्र न्याय न मिळाल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलन किंवा उपोषणाचा पर्याय स्वीकारू,” असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या प्रकरणी कॉलेज प्रशासनाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता प्रतिसाद मिळू शकला नाही. सुनावणीनंतर या प्रकरणाला कोणते वळण लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
