वसई-विरारमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कारासह वीजबिल माफीची मागणी

महापौरांशी सदिच्छा भेट व चर्चा

प्रतिनिधी

विरार : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील शाळांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी अखिल महाराष्ट्र महिला शिक्षक संघाच्या वसई तालुका पदाधिकाऱ्यांनी आज, 23 फेब्रुवारी 2026 रोजी महापौर अजीव पाटील आणि उपमहापौर मार्शल लोपिस यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी शिक्षिकांनी शाळांच्या दुरवस्थेबाबत सविस्तर निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले.

पेल्हार हायवे शाळा आणि जानकीपाडा शाळांच्या इमारती पाडल्यामुळे सध्या विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नासह महापालिका क्षेत्रातील अनेक शाळांच्या इमारती सध्या धोकादायक आणि नादुरुस्त अवस्थेत आहेत. पावसाळा जवळ येत असल्याने, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी या इमारतींची पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी संघाने केली.

धोकादायक शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती पूर्ण करणे. महानगरपालिका क्षेत्रातील शाळांचे वीजबिल महापालिकेने स्वतः भरावे.

विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शालोपयोगी साहित्य (वह्या, पुस्तके, गणवेश) शाळा सुरू होताच, म्हणजेच जून महिन्यातच उपलब्ध करून द्यावे. क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार उपक्रम राबवून त्यांना सन्मानित करावे, अशा मागण्या प्रामुख्याने केल्या.

या चर्चेदरम्यान महापौर अजीव पाटील यांनी सर्व मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या. शाळा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असून, तांत्रिक बाबी तपासून जास्तीत जास्त प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जातील, असे आश्वासन त्यांनी शिक्षक संघाला दिले.

या भेटीवेळी अखिल महाराष्ट्र महिला शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्ष कॅथरीन परेरा, जिल्हा कोषाध्यक्ष आसमा शेख, तालुकाध्यक्ष सोनाली भगत, सचिव जोलिना फरगोज, कार्याध्यक्ष ज्युली फर्नांडिस, तसेच सदस्य आबेदा शेख, वीना फरेल आणि रेखा डाबरे उपस्थित होत्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *