
वसई:
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्नाळा येथील ऐतिहासिक स्मारकाचा विकास करण्यासाठी आणि त्याला राष्ट्रीय स्तरावरील दर्जा मिळवून देण्यासाठी वसई-विरार महानगरपालिका सकारात्मक पावले उचलणार आहे. या स्मारकाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच मनपा आयुक्त श्री. पृथ्वीराज बी. पी. यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आयुक्तांनी स्वतः या स्मारकाला भेट देऊन पुढील आवश्यक ती कायदेशीर आणि प्रशासकीय उपाययोजना लागू करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम
काँग्रेसचे जननायक आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वसई-विरार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अर्नाळा येथील महात्मा गांधी यांच्या स्मारकाची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी बापूंच्या स्मृतींना अभिवादन करून, राहुल गांधी यांच्या जीवनात बापूंचा अहिंसा आणि प्रेमाचा संदेश सदैव मार्गदर्शक ठरो, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांनी केली.
स्मारकाला राष्ट्रीय दर्जा देण्याची मागणी
विशेष बाब म्हणजे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थी अर्नाळा येथे आणून हे स्मारक उभारण्यात आले आहे. हे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, या स्मारकासाठी विशेष आर्थिक तरतूद (निधी) करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. हे ठिकाण केवळ एक पर्यटन स्थळ न राहता, देशातील प्रत्येक नागरिकासाठी एक प्रेरणास्थळ बनावे आणि याला राष्ट्रीय स्तरावरील स्मारकाचा दर्जा मिळावा, अशा मागण्यांचे निवेदन आयुक्तांना सुपूर्द करण्यात आले.
“इतके मोठे आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थळ आपल्या कार्यक्षेत्राच्या इतक्या जवळ आहे, हे ऐकून मनपा आयुक्तही काही क्षणांसाठी भावुक झाले. त्यांनी अत्यंत आत्मीयतेने या विषयाची दखल घेतली असून, आयुक्तांचा सकारात्मक दृष्टिकोन पाहता या स्मारकाला लवकरच राष्ट्रीय दर्जा मिळेल, अशी आशा आहे.”
— काँग्रेस शिष्टमंडळ
चर्चेदरम्यान ‘हे’ मान्यवर होते उपस्थित
आयुक्तांसोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण चर्चेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कॅप्टन निलेश पेंढारी, वरिष्ठ नेते ओनिल अल्मेडा, प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे, किरण शिंदे, रतन तिवारी, संदीप कनोजिया, भीमराव पेटकर, रफीक शेख, राजूभाई, अखलाख शेख उपस्थित होते. तर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त श्री. पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्री. संजय हेरवाडे आणि अतिरिक्त आयुक्त श्री. दीपक सावंत उपस्थित होते.
“गांधी हा केवळ भूतकाळ नाही, तर तो भारताचा भविष्यकाळही आहे,” अशा भावना व्यक्त करत वसई-विरार जिल्हा काँग्रेसने या स्मारकाच्या पुनरुज्जीवनासाठी पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
