
मधुरम’मधील अनधिकृत बांधकामांवर केवळ ‘दिखाऊ नोटीस’चा खेळ; प्रशासकीय अभय की संगनमत?
‘
वसई (विशेष प्रतिनिधी): वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून, या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याची ज्यांची मुख्य जबाबदारी आहे, त्या ‘जी’ प्रभाग समिती, वालीवचे सह आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी आणि मनपा प्रशासनच अनधिकृत विकासकांना पाठबळ देत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. परिसरातील गाजत असलेल्या ‘मधुरम’ औद्योगिक संकुलात विहित परवानगीशिवाय उभी राहिलेली अनधिकृत बांधकामांची प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत.प्राप्त माहितीनुसार, या अनधिकृत बांधकामांवर कडक कायदेशीर कारवाई करून हातोडा चालवणे अपेक्षित असताना, मनपा प्रशासन आणि वालीव प्रभाग समितीचे सह आयुक्त केवळ कागदोपत्री ‘दिखाऊ नोटीसा’ काढून वेळ मारून नेत आहेत. सुनावणी आणि कागदी घोडे नाचवण्याच्या दिखाव्यामागे या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालण्याचा आणि त्यांना संगनमताने सहकार्य करण्याचा घातकी खेळ सुरू असल्याची कुजबूज दबक्या आवाजात नव्हे तर उघडपणे परिसरात सुरू आहे. वारंवार तक्रारी देऊनही प्रत्यक्ष निष्कासन कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाला जणू काही जनतेने सडेतोड चपराकच लगावली आहे.
