
कामगार नेता (क्राईम रिपोर्टर – समीर शेख)










मुंबई, २३ नोव्हेंबर : पवई येथील मोरारजी नगर, दर्गा रोड आणि ‘निती’ (NITIE / IIM) परिसरातून जाणाऱ्या प्रस्तावित ९० फुटी डीपी (DP) रस्ता रुंदीकरणाला स्थानिक नागरिकांनी तीव्र कायदेशीर विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (MRTP Act) च्या कलम ३७ आणि कलम ३८ अंतर्गत या प्रस्तावात आवश्यक ते बदल करून रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी करत रहिवाशांनी महापालिकेच्या विकास नियोजन (DP) विभाग तसेच ‘एस’ वॉर्ड (S-Ward) कार्यालयात लेखी हरकती व निवेदन सादर केले आहे.
‘७० फुटी’वरून थेट ‘९० फुटी’चा घाट; पारदर्शकतेचा अभाव
सुरुवातीला ७० फूट रस्ता रुंदीकरणाच्या आधारे नोटिसा बजावण्यात आल्या असताना, त्यानंतर अचानक रस्ता ९० फूट रुंद करण्याचा प्रस्ताव पुढे कसा आला, याबाबत प्रशासनाने कोणताही स्पष्ट खुलासा केलेला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या निर्णयामागील तांत्रिक व प्रशासकीय आधार काय, किती कुटुंबे बाधित होणार आणि त्यांचे पुनर्वसन कसे होणार, याबाबत स्थानिकांना अंधारात ठेवले जात असल्याची भावना रहिवाशांमध्ये तीव्र आहे.
‘एस’ वॉर्डमधील बैठकीतही अनुत्तरित प्रश्न
या मुद्द्यावर स्थानिक नागरिकांनी नगरसेविकेसह ‘एस’ वॉर्ड कार्यालयात जाऊन वॉर्ड अधिकारी समरीन सय्यद यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, या बैठकीतही ७० फुटीवरून ९० फुटी रस्ता रुंदीकरणाच्या बदलामागचे ठोस कारण किंवा स्पष्ट निर्णय मिळाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच, नोटिसा देणे, बाधित मालमत्तांची ओळख पटवणे आणि मोजमाप करण्याच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप करत त्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कायदेशीर आक्षेप आणि ग्रामस्थांचा युक्तिवाद
महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांना (विकास नियोजन / नगररचना विभाग) आणि ‘एस’ वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात रहिवाशांनी खालील कायदेशीर व व्यावहारिक मुद्दे मांडले आहेत:
- अनावश्यक रुंदीकरण: मोरारजी नगर, दर्गा रोड ते आयआयएम गेटपर्यंतचा सध्या अस्तित्वात असलेला रस्ता स्थानिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी पुरेसा आहे. सद्यस्थितीतील वाहतूक क्षमता आणि वाहनांची वर्दळ पाहता ९० फूट रस्ता रुंदीकरणाची कोणतीही तांत्रिक किंवा व्यावहारिक गरज नाही.
- विस्थापनाचा धोका: हा रस्ता ९० फूट केल्यास अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या स्थानिक रहिवाशांची घरे आणि उपजीविका धोक्यात येऊन मोठ्या प्रमाणावर विस्थापन होईल.
- मूलभूत सुविधांवर भर हवा: अनावश्यक रस्ता रुंदीकरणावर खर्च करण्याऐवजी परिसरात उद्याने (पार्क), कचरा व्यवस्थापन सुधारणे, तसेच विद्यमान रस्त्यावर योग्य वाहतूक नियंत्रण व पार्किंग व्यवस्था राबवण्याकडे महापालिकेने लक्ष द्यावे.
- MRTP कायद्यानुसार दुरुस्तीची मागणी: महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७ व ३८ मधील तरतुदीनुसार विकास आराखड्यात (DP) सुधारणा करून ९० फूट डीपी रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव रद्द करावा.
प्रशासनासमोर ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
१. ७० फुटीवरून ९० फूट रस्ता रुंदीकरण करण्याच्या निर्णयाचे लेखी स्पष्टीकरण द्यावे. २. डीपी प्लॅन आणि रस्ता रुंदीकरणाशी संबंधित सर्व अधिकृत कागदपत्रे व माहिती सार्वजनिक करावी. ३. नोटिसा बजावणे आणि मालमत्ता मोजमापाच्या प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करावी. ४. बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत आणि हक्कांबाबत स्पष्ट लेखी आश्वासन द्यावे. ५. नागरिकांच्या सर्व प्रश्नांना महापालिका प्रशासनाने लेखी उत्तरे द्यावीत.
हरकतींची मोहीम सुरूच
विकासाच्या नावाखाली स्थानिकांची घरे आणि हक्क हिरावून घेतले जाणार नाहीत, अशी भूमिका घेत सुमारे ३० ते ३५ नागरिकांनी वैयक्तिक व सामूहिक पातळीवर हरकती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. “आधी संपूर्ण माहिती व उत्तरदायित्व, त्यानंतरच पुढील कार्यवाही,” असा पवित्रा पवईतील ग्रामस्थांनी घेतला आहे.
