
प्रतिनिधी, वसई
प्रशासकीय कामाचा डोंगर उपसतानाही साहित्याप्रती असलेली ओढ आणि सखोल संशोधनाची वृत्ती जपणाऱ्या वसई-विरार महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्या ‘पेशवेकालीन प्रशासनिक मराठी’ या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी पालघर ग्रंथोत्सवाच्या मंचावर दिमाखात संपन्न झाले. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना, एका सनदी अधिकाऱ्याने प्रशासकीय भाषेत केलेल्या या ऐतिहासिक संशोधनाचे कौतुक सर्वच स्तरांतून होत आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मनोहर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने माणिकपूर येथील समाजउन्नती मंडळाच्या आवारात दोन दिवसीय ‘पालघर ग्रंथोत्सव २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका वीणा गव्हाणकर यांच्या हस्ते ग्रंथदिंडीने करण्यात आले.
प्रशासकीय कर्माचा ‘साहित्यिक’ प्रवास
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते आयुक्त सूर्यवंशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन. डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाविषयी बोलताना सूर्यवंशी भावूक झाले. “नोकरीत लागण्यापूर्वी मी हा प्रबंध लिहिला होता. आज प्रशासकीय सेवेतून निवृत्त होताना त्याचे पुस्तकरूपात प्रकाशन होत आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबाला याचा अधिक आनंद आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्या पत्नी मीना सूर्यवंशी आणि कन्या रिषिका जिचकार यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
मान्यवरांची दाद
- वीणा गव्हाणकर: “वाचन म्हणजे केवळ डोळ्यांचा नव्हे, तर मेंदूचा व्यायाम आहे. आयुक्तांनी अशा विषयात संशोधन करून भाषेचा वारसा जपला, हे अभिनंदनीय आहे.”
- विवेक पंडित (अध्यक्ष, आदिवासी क्षेत्र आढावा समिती): “एका प्रशासकीय अधिकाऱ्याने संशोधनात दाखवलेली ही चिकाटी वाखाणण्याजोगी आहे.”
- स्नेहाताई दुबे-पंडित (आमदार): “शहरात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी अशा ग्रंथांची गरज आहे. पालिकेने पुस्तक विक्री केंद्रांना प्रोत्साहन द्यावे.”
- अजीव पाटील (महापौर): “शहरात फिरते वाचनालय सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आयुक्तांचे हे पुस्तक भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल.”
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांनी ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’मधील संवादांनी उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याला उपमहापौर मार्शल लोपीस, विरोधी पक्षनेते मनोज पाटील, माजी महापौर नारायण मानकर, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपआयुक्त अजित मुठे आणि डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन वीरेंद्र पाटील यांनी आणि आभार प्रदर्शन प्रदीप जाधव यांनी केले.
विशेष टिप: हा ग्रंथोत्सव २८ मार्च रोजीही सुरू राहणार असून, पुस्तक प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
