





प्रतिनिधी, वसई:
वसई तालुक्यात सीएनजी आणि पेट्रोल पंपांवर सर्वसामान्यांची लूट करण्याचे प्रकार आता शिगेला पोहोचले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका खळबळजनक घटनेत, चक्क तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकानेच या लुटीचा पर्दाफाश केला आहे. मात्र, कारवाईसाठी गेलेल्या या सरकारी अधिकाऱ्यालाच पंपावरील कर्मचाऱ्यांनी घेराव घालून धक्काबुक्की केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर वसईतील ‘गुंडगिरी’ करणाऱ्या अशा पंपांचे परवाने रद्द करून त्यांना कायमचे सील ठोकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नेमकी घटना काय?
वसई तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांना तक्रार प्राप्त झाली होती की, नालासोपारा पूर्वेकडील ‘गुजरात गॅस पेट्रोल पंपावर’ रिक्षाचालकांकडून निर्धारित दरापेक्षा जास्त पैसे उकळले जात आहेत. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी सोनार यांनी स्वतः रिक्षात बसून ‘डिकॉय’ कारवाई केली. यावेळी पंपावरील कर्मचाऱ्यांनी रिक्षाचालकांकडून प्रति गॅस भरणा ३० रुपये अतिरिक्त घेतल्याचे उघड झाले.
जेव्हा अधिकारी सोनार यांनी आपली ओळख सांगून जाब विचारला, तेव्हा पंपावरील मॅनेजर सुरेश मिश्रा आणि इतर कर्मचाऱ्यांनी नम्रता दाखवण्याऐवजी अधिकाऱ्यालाच अरेरावी केली. इतकेच नव्हे तर, ड्युटीवर असलेल्या सरकारी अधिकाऱ्याला घेराव घालून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
अवैध वसुलीचे मोठे रॅकेट?
पोलिसांनी केलेल्या चौकशीत पंपावरील कर्मचाऱ्याकडे अवैध रित्या जमा केलेली रोख रक्कम सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही वसुली केवळ कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नसून, यात पंपाचे मालक आणि व्यवस्थापनाचेही संगनमत असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे. दररोज हजारो रिक्षाचालकांकडून अशा प्रकारे ‘कमिशन’च्या नावाखाली लाखो रुपयांची लूट केली जात असल्याचे चित्र आहे.
प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा
पेल्हार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, केवळ गुन्हा दाखल करून हे प्रकरण शमणार नाही. वसई-विरारमध्ये अशा अनेक पंपांवर रिक्षाचालकांना वेठीस धरले जाते.
”जर एका सरकारी अधिकाऱ्यासोबत भरदिवसा अशी वर्तवणूक होत असेल, तर सामान्य रिक्षाचालकाची काय अवस्था होत असेल? अशा गुंड प्रवृत्तीच्या पंप मालकांवर कठोर कारवाई करून त्यांचे परवाने कायमचे रद्द करायला हवेत,” अशी संतप्त भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
