• सांडोर-सालोली येथील उचलेश्वर तलावातील प्रकार; सुशोभीकरणाच्या नावाखाली तलाव परिसराची उघड वाट
  • दैव बलवत्तर म्हणून ४० ते ५० रहिवाशांचा जीव वाचला; पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी चौकशी करण्याची मागणी

वसई: तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली केलेल्या अयोग्य व ओबडधोबड खोदकामामुळे वसईतील सांडोर-सालोली येथील ऐतिहासिक उचलेश्वर तलावाच्या किनाऱ्यावरील शंभर वर्षांची ३ भव्य वडाची झाडे बुधवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मुळासकट उपटून तलावात कोलमडली. ही झाडे लगतच्या गाववस्तीच्या दिशेने न पडता तलावात पडल्याने सुदैवाने ४० ते ५० रहिवाशांचा जीव वाचला असून मोठा अनर्थ टळला आहे.

नेमका प्रकार काय?

​सांडोर-सालोली येथील उचलेश्वर तलावाचे २ वर्षांपूर्वी सुशोभीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र, काम करताना अत्यंत बेजबाबदारपणे झाडांच्या मुळांशीच मोठे ओबडधोबड खोदकाम करण्यात आले. तलावातील माती काढून ती झाडांच्या संरक्षणासाठी किनाऱ्यावर न टाकता परस्पर गावाबाहेर नेण्यात आली. “माती झाडांच्या कडेला टाका, अन्यथा झाडे कमकुवत होतील,” असा इशारा त्यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी संबंधित लोकप्रतिनिधी व ठेकेदारांना दिला होता. मात्र गावकऱ्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. गेल्या दोन वर्षांत तलावाचे सुशोभीकरण तर झालेच नाही, उलट खोदकामामुळे झाडांची मुळे भुसभुशीत झाली आणि अखेर पावसाच्या पावसात ही शतकोत्तरी झाडे जमीनदोस्त झाली.

स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याचा तीव्र संताप

​या दुर्घटनेनंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जेरी मच्याडो यांनी घटनास्थळी भेट देऊन तीव्र संताप व्यक्त केला.

“सुशोभीकरणाच्या नावाखाली झालेल्या अयोग्य कामामुळेच ही ऐतिहासिक झाडे कोलमडली आहेत. झाडे जर वस्तीतील घरांवर पडली असती, तर ४० ते ५० निष्पाप लोकांचा जीव गेला असता. वसई-विरार महापालिका प्रशासन आणि स्थानिक आमदार स्नेहा ताई यांनी तात्काळ या जागेची पाहणी करावी. तलावाचे काम घेणारा ठेकेदार, जबाबदार अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसेच, तलावाच्या चारी बाजूंना असणाऱ्या उर्वरित झाडांचे संरक्षण करून रहिवाशांच्या जीवितास असणारा धोका दूर करावा,” अशी ठाम मागणी जेरी मच्याडो यांनी केली आहे.

​पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी आणि उरलेल्या झाडांचे प्राण वाचवण्यासाठी प्रशासन आता तरी जागे होऊन कारवाई करणार का, असा सवाल सांडोर-सालोलीचे नागरिक विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed