
कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीतही मोठा घोळ; ‘द व्हाईस ऑफ वसई पीपल’ चा महापालिकेवर जोरदार घणाघात.
• मोकळ्या भूखंडांवर पत्राशेड, तर नियमांची पायमल्ली करून उभ्या राहतायत शाळा!
• आमरण उपोषणाचा इशारा दिल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?



प्रतिनिधी, वसई / विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रात अनाधिकृत बांधकामांचे पेकाट पसरले असताना, महापालिका प्रशासन मात्र ‘डोळ्यांवर झापडे’ ओढून गप्प बसल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आयुक्त व महापौरांचे “एकही अनाधिकृत बांधकाम होऊ देणार नाही” असे कागदी आदेश असताना, प्रत्यक्षात मात्र प्रभागा-प्रभागात बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. याविरोधात सामाजिक संघटना ‘द व्हाईस ऑफ वसई पीपल’ने आक्रमक पवित्रा घेतला असून थेट आंदोलनाचा आणि सनदशीर मार्गाने प्रशासनाची पोलखोल करण्याचा इशारा दिला आहे.कामण येथील ‘ए-वन इंडस्ट्रियल’ परिसरातील मोकळ्या भूखंडांवर (Open Spaces) महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता धडाक्याने अनाधिकृत पत्राशेडचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम रातोरात आणि अत्यंत बेकायदेशीरपणे उभारले जात असून, याकडे स्थानिक प्रभाग समिती ‘जी’ (वालीव) च्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप ‘द व्हाईस ऑफ वसई पीपल’चे अध्यक्ष अशोक पांडे यांनी केला आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत आणि सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांना लेखी तक्रार देऊनही अद्याप कारवाईचा हातोडा पडलेला नाही.सातीवली, तुंगार फाटा क्षेत्रातील ‘एस. आर. हायस्कूल’च्या (S.R. High School) इमारतीचे अनाधिकृत काम सध्या वेगाने सुरू आहे. महापालिकेची कसलीही रीतसर परवानगी न घेता हे धोकादायक बांधकाम केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बांधकामावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (MRTP Act) अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून निष्कासनाची कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पुराव्यादाखल प्रत्यक्ष बांधकामाचे छायाचित्रे देऊनही पालिका अधिकारी मूग गिळून गप्प का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.केवळ अनाधिकृत बांधकामेच नव्हे, तर आस्थापना विभागातही मोठ्या प्रमाणावर सावळागोधळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. महापालिकेच्या आस्थापना विभागाने ३ वर्षे सेवाकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. मात्र, प्रभाग समिती ‘एफ’ मधील भांडार विभागात गेल्या १० वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या एका वरिष्ठ लिपिकाचे नाव या यादीतून गूढरीत्या गायब करण्यात आले आहे! बदल्यांची ही यादी कोणाच्या आशीर्वादाने आणि कशी तयार झाली, असा प्रश्न उपस्थित करत जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
“महापालिकेत नियम फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत का? मोकळ्या जागा हडपल्या जात आहेत, बेकायदेशीर शाळा उभारल्या जात आहेत आणि प्रशासकीय बदल्यांमध्येही पारदर्शकता नाही. आम्ही कायदेशीर मार्गाने सर्व पुरावे सादर केले आहेत. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर सहाय्यक आयुक्त कार्यालय तसेच पालिका मुख्यालयासमोर ‘आमरण उपोषण’ आणि ‘धरणे आंदोलन’ छेडले जाईल.” — अशोक आर. पांडे (अध्यक्ष, द व्हाईस ऑफ वसई पीपल)
- MRTP अंतर्गत कारवाई का नाही? — बेकायदेशीर बांधकामांवर एमआरटीपी कायद्यानुसार त्वरित एफआयआर (FIR) दाखल करण्याची तरतूद असताना अधिकारी कोणाला वाचवत आहेत?
- ३ वर्षांचा नियम कोणासाठी? — १० वर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्याचे नाव बदल्यांच्या यादीतून वगळण्यामागे कोणते ‘आर्थिक गणित’ दडले आहे?
- मुख्यालयाचा धाक उरला नाही का? — आयुक्तांच्या स्पष्ट सूचना असतानाही प्रभाग समिती ‘जी’ च्या हद्दीत रोज नवे पत्राशेड कसे उभे राहतात?

