नोवा इंडस्ट्रियल इस्टेट समोरील फादरवाडी परिसरातील तबेल्याजवळ अनधिकृत औद्योगिक गाळ्यांची वाढ — स्थानिकांनी व्यक्त केली चिंता!
वालीव विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांच्यावर निष्क्रियतेचे आरोप

वसई / प्रतिनिधी :
फादरवाडी परिसरात गुरुवारी दुपारी अंदाजे २.४५ वाजण्याच्या सुमारास एका भंगार गोदामास भीषण आग लागली. या आगीत आजूबाजूला असलेल्या काही अनधिकृत औद्योगिक गाळ्यांनाही नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तीय नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

या घटनेनंतर परिसरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नोवा इंडस्ट्री (सर्वे क्र. २२२/१) समोर व तबेल्याच्या शेजारील फादरवाडी भागात अनधिकृत औद्योगिक गाळ्यांचे बांधकाम सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या बांधकामांना कोणाचे संरक्षण आहे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

“अपघात झाल्यावरच जाग येते का?” – स्थानिकांचा सवाल

नागरिकांनी सांगितले की, अशा प्रकारच्या अनधिकृत व निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे अनेक वेळा अग्निशमन दलालाही घटनास्थळी पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. त्याचा अनुभव या घटनेतही आला. या प्रकारांमुळे कामगार व स्थानिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.

वालीव विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांच्यावर काही स्थानिकांनी अनधिकृत बांधकामांवर आवश्यक ती कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, कारवाईसंदर्भात निष्क्रियतेचा आरोप केला जात आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्याची मागणी

या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी याप्रकरणात लक्ष घालावे, तसेच वालीव विभागात अधिक सक्षम व निष्पक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

“प्रशासनाचे लक्ष केवळ आगीत होरपळल्यानंतरच का जाते? या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ पालिकेवर आली आहे,” असे नागरिक सूचित करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *